‘अजितदादां'च्या इशाऱ्याकडे बारामतीकरांचेच दुर्लक्ष; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 02:15 PM2021-02-22T14:15:02+5:302021-02-23T16:47:16+5:30
कोरोनाचे संकट पुन्हा वाढल्याने नागरिकांनी कमालीची काळजी घ्यायला हवी. अन्यथा पुन्हा काही कठोर निर्णय नाईलाजाने घेण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.
बारामती : राज्यात कोरोनाच संकट पुन्हा वाढल्याने नागरिकांनी कमालीची काळजी घ्यायला हवी. अन्यथा पुन्हा काही कठोर निर्णय नाईलाजाने घेण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वी बारामतीकरांना दिला आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र बारामतीत सोमवारी (दि.२२) पाहावयाला मिळाले. कोरोनाच्या नियमांचा सर्वांनाच विसर पडल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी शनिवारी (दि. २० ) बारामतीत पार पडलेल्या विविध कार्यक्रमात कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले होते. कोरोनाची भीती संपल्यासारखे अनेकजण मास्क न वापरता वावरत आहेत. मास्कचा वापर, सॅनिटायझर्सचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शासनाने गर्दीबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी नियमावलीचे सर्वांनी पालन करावे. एकदा कोरोना झाला की पुन्हा कोरोना होणारच नाही, अशा समजूतीत राहू नका, दोनदा नाही काहींना तर तीनदा कोरोना झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या,असा इशारा देखील पवार यांनी दिला होता.या कार्यक्रमाला अवघे दोन दिवसच उलटले आहेत.मात्र,त्या आवाहनाचा बारामतीकरांना जणु विसरच पडला आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. सोमवारी(दि २२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रशासकीय भवनमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंंबड उडालेली पहावयास मिळाले. कोरोनाच्या नियमांकडे देखील सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले.
——————————————————
शासकीय कार्यालयामध्ये अनावश्यक गर्दी करणारावर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या नियम मोडणाऱ्यांवर दिवसाला 300 च्यावर केसेस दाखल होत आहेत. मंगल कार्यालये, हॉटेल व्यावसायिक यांना देखील सूचना दिल्या आहेत. 50 व्यक्ती च्या ज्या ठिकाणी गर्दी दिसेल त्यांची पथकामार्फत तपासणी करून कारवाई करण्यात येईल.
- नारायण शिरगांवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग