स्वत:ला फक्त मिरवायचे काम केले! बारामतीकरांचे श्रीनिवास पवारांच्या टीकेला पत्रातून प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 08:52 AM2024-03-20T08:52:51+5:302024-03-20T09:07:58+5:30
देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
Ajit Pawar ( Marathi News ) : देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. पवार कुटुंबातील सर्वच सदस्य सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही काटेवाडीत बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवारांवरील टीकेला आता पत्रातून प्रत्युत्तर दिले आहे. 'सुज्ञ बारामतीकरांचे मत' या नावाने सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे.
काटेवाडी येथील बैठकीत बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. "माझे काही मित्र म्हणाले आता इथून पुढे दादांची वर्षे आहेत. साहेबांची काही नाहीत. तो विचार मला वेदना देऊन गेला. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. का तर आपण पुढची १० वर्षे दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, याच्यासारखा नालायक माणूस नाही, असे माझे वैयक्तीक म्हणणे आहे, अशी टीका श्रीनिवास पवार यांनी केली होती, यावरुन दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मनसेची मुंबईतील 5 लाख मते कुणाच्या पारड्यात? लोकसभेच्या सहा जागांचे भवितव्य होणार निश्चित
व्हायरल पत्रात काय आहे?
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी- खोटा सहानभूतीदार
श्रीनिवास बापू नालायक हा शब्द आपण किती सहज वापरला... पण हा शब्द वापरत असताना आपण सोईस्कर पणे का विसरला आपण आजपर्यंत आपल्या बारामतीसाठी, समाजासाठी काय केले, एका बाजूला समजा प्रति आपण काय तरी देणं लागतो ह्या कडे डोळाझाक करून दुसरी कडे मात्र केवळ अजित दादांचे छोटे बंधू म्हणून स्वतःला फक्त मिरवायचे काम केले.
वास्तविक पाहता कुठलेही व्यक्ती राजकारण, समाजकारण किंवा आपल्या व्यवसायामध्ये स्वकर्तुत्व आणि जिद्दीच्या जोरावर आपला ठसा उमटावते, अजितदांदाच्या कडे पाहिले तर ते सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे आज अजितदादा पहाटे पासून रात्री उशिरा पर्यंत काम करतात, जनतेमध्ये मिसळतात त्यांची कामे मार्गी लावतात, हे बारामतीकरांच्या बरोबर संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांची कबुली इतर मान्यवरांच्या बरोबर खुद्द पवार साहेबांनी वेळोवेळी दिली आहे.
बापू तुम्ही बोलताना म्हणाला की मला पण पवार साहेबांच्या सारखे काका मिळाले पाहिजे होते पण तुम्ही हे विसरला की फक्त काका मिळून चालत नाही तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तुत्व, दातृत्व आणि नेतृत्व गुण असावे लागतात. पण आज अचानक सपत्नीक पुढे येऊन अजितदादा च्या बद्दल जे मत व्यक्त केले आहे त्यामध्ये कुठला तरी स्वार्थ नक्कीच लपलेला आहे अशी शंखा उपस्थित होते कारण दादांच्या अनेक निर्णयात आपण दादांच्या बरोबर दिसला होता.
बारामतीकर म्हणून असे वाटते की तुम्ही एकतर अजित दादांना कायम व्हीलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाला असावे किंवा आपल्या बायको-पोरांच्या असणाऱ्या राजकीय महत्वकांक्षेपोटी आपण हे पाऊल टाकले असावे.
शेवटी आम्ही बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की आम्ही घोंगडं भिजवत ठेवणाऱ्या खोटी सहाभूतीदार लोकांच्या मागे न उभा राहता प्रत्येक्षात विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागे म्हणजेच अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत.
आणि श्रीनिवासबापू आमचं ठरलंय 'घड्याळ तेच वेळ नवी'
असं या पत्रात म्हटेल आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हे पत्र जोरदार व्हायरल झाले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या विरोधातही बारामतीकरांचे एक पत्र व्हायरल झाले होते. या पत्रात अजित पवारांविरोधात जोरदार टीका केली होती.