शहरातील मुख्य चौकात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकात येणारे मुख्य रस्ते बंद करण्याचे नियोजन यशस्वी ठरले आहे. शहरातील चौकाचौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत. शहरात चारही बाजुने येणा-या रस्त्यांवर पोलिसांनी वाहनांची कसून चौकशी केली. रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी बारामती उपविभागात पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. उपविभागात २१ अधिकारी, ४८२ पोलीस कर्मचारी, २४७ होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यात बारामती शहर व तालुक्यासाठी १६ अधिकारी, २१२ पोलिस कर्मचारी, १२४ होमगार्ड तैनात आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
शहरात प्रवेश करणारे रस्ते व मुख्य चौकात २३ ठिकाणी बारामती नगर पालिका प्रशासनाने बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात मोकाट फिरणा-यांची चौकशी करण्यात येत आहे. शहरातील अत्यावश्यक सेवांमध्ये औषधांची दुकाने, डेअरी पदार्थ, भाजी मंडई, किराणा भुसार मालाची दुकाने तसेच हॉटेल मधुन पार्सल सेवा सुरू आहे. बारामती नगर परिषदेच्या पथकाकडून विनामास्क आढळल्यास ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशावरून आजपासून मेडिकल दुकान वगळता सर्व अत्यावश्यक सेवा संध्याकाळी सहा वाजता बंद होणार आहेत. पथक प्रमुख बापू सरोदे यांनी याबाबत माहिती दिली.
बारामती शहरात मुख्य चौकात बॅरिकेड्स बांधण्यात आले आहेत.
१५०४२०२१-बारामती-०९