बारामती : बारामतीची ओळख संपुर्ण देशाला करुन देणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पक्षाध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सर्वसामान्य बारामतीकरांसह राजकीय पदाधिकाऱ्यांना धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस भवनसह शहरात सर्वत्र शांतता पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी बहुतांश पदाधिकारी धक्क्यातून न सावरल्याने याबाबत प्रतिक्रीया देण्यास असमर्थता दर्शविली.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले कि, 'पवारसाहेब' यांचे महत्व केवळ पक्षापुरते मर्यादित नाही. राज्यासह संपुर्ण देशासाठी ते वटवृक्षच आहेत. त्यांच्या छायेखाली संपुर्ण देशाने, महाराष्ट्राने वेगवेगळ्या संकटावर मात केली आहे. साखर उद्योग उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. कृषि,शिक्षण,क्रिडा सर्वच क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता त्यांची आपल्या सर्वांना गरज आहे.अजितदादांनी याबाबत कमिटी निर्णय घेणार असल्याचे जाहिर केले आहे. साहेबांचे असणे आपल्या सर्वांसाठी मोठा आधार असल्याचे काटे म्हणाले.
मळद येथील शेतकरी प्रल्हाद वरे म्हणाले ,आम्ही शेतकरी साहेबांना भेटायला जाणार आहोत. त्यांना हा निर्णय माघारी घेण्यासाठी साकडे घालणार आहे. त्यांच्यामुळे देशातील शेतकरी आज टिकून आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. साहेब शेतकऱ्यांसाठी तरी हा निर्णय घ्या, अशी विनंती पवार यांना करणार असल्याचे वरे म्हणाले.
वस्ताद कधीही कुस्ती सोडत नसतो
दरम्यान,अनेकांनी सोशल मिडीया अकाऊंटवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे 'महाराष्ट्राचा सह्याद्री' असे छायाचित्र ठेवले. पवार यांचे प्रत्येकाच्या मनातील स्थान बारामतीकरांनी सोशल मिडीयावर अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. वस्ताद कधीही कुस्ती सोडत नसतो, तो आणखी नव्या जोमाने पैलवानांची भावी पिढी घडवितो. साहेब तुम्ही आमच्या पाठीशी होता,आहात आणि कायम रहाल,हि पोस्ट ठेवत अनेकांनी पवार यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या. साहेब तुमच्या सारखा सच्चा राजकारणी महाराष्ट्राला मिळाला नसता, तर महाराष्ट्राचा केव्हाच युपी, बिहार झाला असता, ही पोस्ट देखील सर्वाधिक 'व्हायरल' झाल्याचे चित्र होते.