बारामती: बारामती नगरपरीषदेच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे १५६ वे ‘बजेट’ गुरुवारी( दि. २५) सादर करण्यात आले. १०३४ कोटी ५५ लक्ष ३७ हजार १०१ रुपयांचे बजेटचा यामध्ये समावेश आहे. यावेळी १२०१ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. त्यानुसार या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीनंतर बारामतीचा चेहरामोहरा बदलुन जाणार आहे. कोणतीही करवाढ,दरवाढ नसलेल्या या बजेटमध्ये बारामतीकरांवर विविध प्रकल्पांचा अक्षरश: वर्षाव करण्यात आला आहे.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडलेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत माहिती दिली. बृहन्महाराष्ट्र पाणी योजना,शिवसृष्टी,निरा डावा कालवा सुशोभिकरण,सिटी सेंट्रल पार्क,कऱ्हा नदी सुशोभीकरण आदी प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली.
एमआयडीसीतील कल्याणीपासुन निघणाऱ्या बायपास जोडणाऱ्या रस्त्यासाठी यंदा तरतूद करण्यात आली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या चारही बाजूने जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण,सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बारामती शहरात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी चार साठवण तलाव आहेत.या चार तलावांशिवाय आणखी दोन साठवण तलाव बांधण्यात येणार आहेत.माळावरची देवी मंदिराजवळ तसेच पिंपळी येथील खाणीच्या परिसरात हे तलाव बांधण्यात येणार आहेत. हे तलाव पूर्ण झाल्यास निरा डावा कालवा बंद झाल्यानंतर देखील बारामतीकरांना सहा महिने पिण्याचे पाणी पुरेल एवढी तरतुद करण्यात आली आहे.
पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी हद्दवाढीत जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.त्यासाठी २५ कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
याशिवाय महिला बालकल्याण,अपंग कल्याण,झोपडपट्टी निर्मुलन, जुनी मंडई विकसित करणे,वसंतराव पवार नाट्यगृह विकसित करणे,मुस्लीम समाज सभागृह,उर्दू शाळेसाठी निधीची तरतूद करण्यात आली.शहरातील जुने गावठाण रस्ते विकसित करण्यात येणार आहे.त्यासाठी २५ कोटीं खर्च करण्यात येणार आहेत. सीएसआर मधुन तांदुळवाडी,जळोची,सेंट्रल बिल्डींग परीसर,निरा रस्ता येथे उद्यान विकसित करण्यात येणार आहेत. याशिवाय ३ नवीन सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक गुजर यांनी सांगितले.