बारामती : बारामती शहर- तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये उन्हाचा मोठा चटका बसत असल्याने नागरिक दुपारी घराबाहेर पडताना दिसत नाहीत. शहरात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जिरायती भागात पाण्यासाठी दिवसभर वणवण करावी लागत आहे. टँकर मंजुरीचे प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडून आहेत. सध्या जिरायती भागातील चार गावांना चार टँकरने पाणीपुरवठा होत आहे.शहर व तालुक्यातील तापमानात सध्या वाढ होत आहे. त्यामुळे वाढणाऱ्या तापमानामुळे शहरी भागात उष्णतेने अंगाची लाही लाही होत असल्याने नागरिक थंड शीतपेये, फॅन यांचा आधार घेत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारच्या वेळी उन्हात फिरताना नागरिकांना टोपी, सुती कपडे यांचा तर महिला उन्हापासून रक्षण होण्यासाठी छत्रीचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, सध्या दुपारच्या दरम्यान पारा वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. तसेच हवेतही उष्णता असल्याने गरम हवेचाही नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे दुपारच्या दरम्यान उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांविना रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक घरी थांबणेच पसंत करत आहेत. उकाड्याने हैराण झालेले नागरिक वळवाचा पाऊस कधी पडेल, याचीच चर्चा करताना दिसत आहेत.
बारामतीचा पारा ४२ अंशावर
By admin | Published: April 21, 2017 6:03 AM