बारामती : मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाचा कहर आता कमी होऊ लागला आहे. मार्च महिन्यापासून दिवसागणिक वाढत जाणारी बारामतीतील रुग्णसंख्या मागील आठवड्यापासून उतरणीला लागली आहे. रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी बारामतीचा दैनंदिन पॉझिटिव्ह रेट १३ टक्क्यांवर आहे. बाधित रुग्णांची टक्केवारी १० च्या खाली जात नाही तोपर्यंत रुग्णसंख्या घटल्याचे आपण म्हणून शकत नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ३१ मे व १ जूनला कोरोना संक्रमणामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
बारामतीमध्ये मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंशत: संचारबंदीचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. होता. त्यानंतर संपूर्ण दोन महिने कडक संचारबंदीमुळे मे महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली. तर मेच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमालीची घटून १०० च्या आत आली. १ जूनला घेतलेल्या ४७८ नमुन्यांपैकी ७८ बाधित रुग्ण अाढळून आले आहेत. मागील दोन महिन्यांपासून बारामती शहर व तालुक्यात कहर माजवणारा कोरोना उतरणीला लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रशाासनाने १ जूनपासून १५ जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडक संचारबंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संक्रमण घटण्यास मदत होणार आहे. बारामतीमध्ये मागील वर्षभरात २४ हजार ४३४ कोरोना रुग्ण अाढळून आले. त्यातून २२ हजार ७७१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ६१६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्या देखील सध्या स्थीर आहे.
----------------------------------
या पार्श्वभूमीवर म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय रुई येथे स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून येथे रुग्णांवर मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या डॉक्टरांकडून औषध उपचारांबरोबरच शस्त्रक्रियाही केली जात आहे. सध्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पुण्यात उपचारासाठी पाठविले जात आहे. बारामतीत म्युकरमायकोसिस रुग्णांची मोठी धावपळ होत होती. रुग्ण व नातेवाईकांना पुढील उपचार कुठे घ्यायचे याबाबत संभ्रम होता. रुई येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असणा-या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.
-----------------------------
रुग्णसंख्या घटत असली तरी अद्याप बारामतीचा पॉझिटिव्ह रेट १३ टक्क्यांवर आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे. तसेच इथून पुढच्या काळात देखील स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मनोज खोमणे
तालुका आरोग्य अधिकारी
---------------------------
म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्यादेखील आता नियंत्रणात आहे. सध्या ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांच्या दैनंदिन वैयक्तिक स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात येत आहे. जेणेकरून कोरोनानंतर रुग्णांना म्युकरमायकोसिसचा सामना करावा लागू नये. तसेच रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोणीही बेफिकीर राहू नये.
- डॉ. सदानंद काळे
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय बारामती