पुणे : शेतकरी सक्षमीकरणासाठी पीक पेरणीची माहिती मोबाईलवर अॅपद्वारे घेण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पासाठी सहा महसूली विभागातून सहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे महसुली विभागात बारामती तालुक्याची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. गाव नमुना नं.१२ मध्ये शेतकऱ्यांनी स्वत: पीक पाहणी नोंदविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन कवी मोरोपंत नाट्यगृहात करण्यात आले होते. प्रकल्प सल्लागार टाटा ट्रस्टचे नरेंद्र कवडे, ई फेरफारचे राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे रामदास जगताप, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, गट विकास अधिकारी प्रमोद काळे यावेळी उपस्थित होते.क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी तातडीने संकलित करणे, आकडेवारीत अधिक अचूकता आणणे, या प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. मोबाईल अॅपद्वारे गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंद करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा सहभाग असल्याने विश्वसनीय पीक माहिती हाती येईल. त्याच्या आधारे कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होईल. त्यामुळे पीक विमा योजनांसारख्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुलभता येईल. तसेच, पीक विम्याचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. पिकांची आपत्तीमुळे हानी-नुकसान झाल्यास त्यांना कार्यक्षमतेने मदत करता येणे शक्य होईल. शेतकऱ्यांना हवामान, किडींचा प्रादूर्भाव आणि इतर रोगांच्या उपचारासाठी तातडीने संदेश देणे शक्य होईल. या उपक्रमामुळे शासकीय पातळीवर देखील निर्णय आणि नियोजन करण्याची प्रक्रिया जलद होणार आहे.
मोबाईल अॅपद्वारे घेण्यात येणाऱ्या ई-पीक पाहणीसाठी बारामतीची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 12:03 PM
क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी तातडीने संकलित करणे, त्यात अधिक अचूकता आणणे, या प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.
ठळक मुद्देगाव नमुना नं.१२ मध्ये शेतकऱ्यांकडून स्वत: पीक पाहणी नोंदविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन