बोलेरो पिकअपसह सव्वापाच
लाखांचा मुद्देमाल जप्त
पिकअपसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
बारामती : निरा नदीवरील बंधाऱ्यांचे ‘बरगे’ चोरीप्रकरण पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केले आहे. याप्रकरणी पिकअपसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुका पोलीस स्टेशन येथील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
३ सप्टेंंबर रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी शिरवली (ता. बारामती) येथील नीरा नदीचे बंधाऱ्यांचे ३६ हजार रुपये किमतीचे एकूण २६ बरगे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल आहे. ९ सप्टेंबर सांगवी (ता. बारामती) भागात पेट्रोलिंग करीत असताना पथकाने एक पिकअप संशयावरून ताब्यात घेतली. त्यातील दोन इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला. यावेळी त्यांनी त्यांचे शिरवली (ता. बारामती) येथील एका साथीदाराच्या मदतीने हे गुन्हे केले आहेत. त्यातील मुद्देमाल हा कोंढवा पुणे येथील भंगरवाल्यास विकला असल्याची कबुली दिली. त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी झालेला माल, गुन्ह्यात वापरलेले पिकअप असा एकूण ५ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज जगताप (वय ४८, रा. सासवड), सत्यवान सोनवणे (४०, रा. सोनोरी), प्रमोद अरविंद खरात (२६, रा. शिरवली, ता. बारामती), कादर शेख (४९, रा मार्केट यार्ड पुणे) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हे केल्याबाबत कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढवान, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पोलीस नाईक अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, सहायक फौजदार काशीनाथ राजापुरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
निरा नदीवरील बंधाऱ्याचे ‘बरगे चोरीप्रकरणी मुद्देमाल आणि अटक केलेल्या आरोपींसह पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.
११०९२०२१ बारामती—०८
——————————————————