पुणे : शालन चव्हाण (नाव बदललेले) या पुणे महापालिकेतील सफाई कर्मचारी, घरी आधार नाही तसेच दोन मुलांची जबाबदारी, त्यातच लठ्ठपणामुळे त्रस्त आणि त्यामुळे सांधेदुखी, रक्तदाब असे आजार पाठीशी लागलेले. तसे बघायला गेले तर कामाच्या स्वरुपामुळे दररोज शारीरिक व्यायाम होत होता. पण तरीदेखील वजन ९० किलोच्या वर व उंची कमी तसेच बीएमआय इंडेक्स ३५च्या वर, याशिवाय घोरण्याचा त्रास. त्यामुळे वजन कसे कमी करता येईल यासाठी बर्याच जणांचा सल्ला घेतला. त्यामुळे त्या धनकवडी येथील भारती हॉस्पिटलमधील बॅरिअॅरिट्रिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. केदार पाटील यांच्याकडे तपासणीसाठी गेल्या असता त्यांनी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र यासाठी लागणारा खर्च शालन यांना परवडणारा नव्हता. अशावेळी डॉ. केदार पाटील यांनी पुणे महापालिकेकडे आर्थिक मदत मागण्याचा सल्ला दिला. पुणे महापालिकेतर्फे गरजू रुग्णांना या प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. तसेच पालिकेतील कर्मचार्यांना देखील आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे डॉ. केदार पाटील यांनी भारती हॉस्पिटलमध्ये शालन यांच्यावर अल्प दरात बॅरिअॅट्रिक सर्जरी केली. आता एका महिन्यात त्यांचे वजन सहा किलोने कमी झाले असून सुमारे वीस किलो वजन कमी होणे अपेक्षित आहे. तसेच यामुळे त्यांचा रक्तदाब व सांधेदुखीचा त्रास कमी झाला आहे. याविषयी बोलताना डॉ. केदार पाटील म्हणाले, की याआधी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया ही अतिलठ्ठ लोकांचीच केली जाते व ही शस्त्रक्रिया करणे हे खर्चिक असून ते फक्त ठराविक लोकांनाच शक्य असते असे मानले जात होते. पण पुणे महापालिकेच्या मदतीने आता सर्वसामान्य नागरिक देखील ही शस्त्रक्रिया करु शकतात आणि निरोगी आयुष्य पुन्हा मिळवू शकतात. तसेच काही फायनान्स कंपन्यादेखील आर्थिक मदत उपलब्ध करुन देत आहेत. केंद्रीय कर्मचार्यांना ही शस्त्रक्रिया सीजीएचएस (CGHS)द्वारे करता येते. भारती हॉस्पिटलच्या भूलशास्त्र व सर्जरी विभागाचे व मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले. याविषयी पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी अंजली साबणे म्हणाल्या, की ओबेसिटी या आजाराचे प्रस्थ वाढले असून हा आजार आता महापालिका कर्मचार्यांमध्ये देखील पाहिला मिळत आहे. या आजारामुळे कार्यकुशलता काही प्रमाणात कमी होते. त्यामुळे आॅपरेशनची गरज पडते. पालिकेकडून विविध आरोग्य योजनेअंतर्गत पालिका कर्मचार्यांना उपचारासाठी मदत केली जाते.
गरजू रुग्णांसाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया शक्य; पुणे महापालिकेचे सहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 1:20 PM
पुणे महापालिकेतर्फे गरजू रुग्णांना बॅरिअॅट्रिक प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. तसेच पालिकेतील कर्मचार्यांना देखील आर्थिक मदत दिली जाते.
ठळक मुद्देडॉ. केदार पाटील यांनी भारती हॉस्पिटलमध्ये शालन यांच्यावर अल्प दरात बॅरिअॅट्रिक सर्जरी केली.एका महिन्यात त्यांचे वजन सहा किलोने कमी झाले असून सुमारे वीस किलो वजन कमी होणे अपेक्षित आहे. पालिकेकडून विविध आरोग्य योजनेअंतर्गत पालिका कर्मचार्यांना उपचारासाठी मदत केली जाते.