पुणे :मावळ मतदारसंघातील मतदानाची तारीख जवळ येत असल्याने उमेदवारांची प्रचारयंत्रणा जोरदार काम करताना दिसत आहे. या मतदारसंघात मुख्य लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यामध्ये आहे. दोन्ही उमेदवारांसाठी त्या-त्या पक्षाचे बडे नेते तसेच अभिनेतेही प्रचारासाठी मैदानावर उतरत आहेत. बुधवारी पिंपरीमध्ये आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची जाहीर सभा झाली. यावेळी मात्र अबकी बार मोदी सरकार…अबकी बार श्रीरंग बारणे खासदार अशी स्वतःच म्हणण्याची वेळ बारणेंवर आली आहे.
पिंपरीतील सभेत रामदास आठवले यांच्या समोर उमेदवार श्रीरंग बारणेंनी भाषण करत होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘अबकी बार मोदी सरकार, अबकी बार श्रीरंग बारने खासदार’. त्यावेळी त्यांच्या या घोषणेला विशेष असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चर्चला उधाण आले आहे. महायुतीचे सर्व उमेदवार ‘अबकी बार मोदी सरकार, अबकी बार चारसो पार'च्या घोषणा देत आहेत पण बारणे यांच्या 'अबकी बार श्रीरंग बारने खासदार' या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधले.
श्रीरंग बारणेंनी २०१४ आणि २०१९ मधील दोन्ही लोकसभा निवडणुकांवेळी बलाढ्य अशा उमेदवारांना पराभूत केले होते. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा प्रचार पाहता त्यांचे बारणेंसमोर आव्हान असणार आहे. बारणे यांच्या प्रचारासाठी बुधवारी पिंपरीत सभा घेण्यात आली. यावेळी रामदास आठवले यांनी या सभेला संबोधित केले होते.
पिंपरीतील सभेत बारणे म्हणाले, ही निवडणूक नात्यागोत्याची नसून देश कुणाच्या हातात द्यायचा यासाठी आहे. विरोधक माझ्याबद्दल गैरसमज पसरण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी श्रीरंग बारणे यांनी ‘अबकी बार मोदी सरकार.. अबकी बार श्रीरंग बारणे खासदार’ असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. यामुळे सभेदरम्यान बारणेंच्या या घोषणेमुळे चर्चांना उधाण आले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातून ३८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी छाननीमध्ये तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर ३५ उमेदवार पात्र ठरले होते. अर्ज माघारी घेण्याची सोमवारी अंतिम मुदत होती. त्यामध्ये दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात ३३ उमेदवार राहिले आहेत. महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यामध्ये खरी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.