पुणे : वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंगळवार पेठेतील महापालिकेच्या कै. भागुजीराव अनाजीराव बारणे विद्यालयाचे (शाळा क्र. १५) स्थलांतर करू नये़, अशी मागणी स्थानिक नगरसेविका पल्लवी जावळे यांनी केली आहे.
या शाळेत मंगळवार पेठ परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील २५० विद्यार्थी शिक्षण घेत असून, ही शाळा अन्यत्र स्थलांतरित केल्यास त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, अशी भीती जावळे यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे़ सदर शाळा मंगळवार पेठेतील जुनी शाळा असून, यामध्ये २००९ पासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत़ शाळेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर १२ आणि दुसऱ्या मजल्यावर १२ अशा वर्गखोल्या आहेत. यापैकी एका मजल्यावर इंग्रजी माध्यमांचे, तर एका मजल्यावर मराठी माध्यमांची शाळा भरते.
नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी या शाळेतील १२ वर्गखोल्या देऊनही, एका मजल्यावर दोन सत्रांत शाळा सुरू ठेवता येऊ शकते. मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ही शाळा मध्यवर्ती असल्याने सोयीची असल्याने या शाळांचे स्थलांतर करू नये, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे़