पुणे - ‘पाणी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने महाराष्ट्राच्या नकाशावर नाव कोरले. फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरावर सुर्डी या गावाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सिने अभिनेते आणि पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमीर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्विकारला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पाणी फाउंडेशनकडून 75 लाख रुपये आणि ट्रॉफीचे पारितोषिक गावासाठी देण्यात आले आहे.
पुण्यातील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने शानदार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात पाणी फांउडेशनचे अध्यक्ष अमीर खान, मुख्यमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंच पोपटराव पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच राज्यातून निवड झालेल्या गावांमधीलल ग्रामस्थांनीही हजेरी लावली होती. या शानदार सोहळ्यात डीजिटल बोर्डवर सुर्डीचे नाव झळकताच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. सोलापूर जिल्ह्यातून 6 तालुक्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यामध्ये, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यांचा सहभाग आहे. तालुकास्तरावर बार्शी तालुक्यातून चिंचोली गावचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यामुळे पाणी फाउंडेशनकडून चिंचोलीस 10 लाख रुपये आणि ट्रॉफी असे बक्षीस देण्यात आले. तर, तालुकास्तरावर अरनगावचा द्वितीय क्रमांक आला आहे.
विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याला 'सुर्डी'च्या रुपाने गेल्या 4 वर्षात पहिल्यांदाच वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरीय बहुमान मिळाला आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यासह जिल्ह्यावासीयांनी आनंद व्यक्त करत गावकऱ्यांचे अभिनंदन केले. तर, बार्शीकर मोठ्या हक्काने ''गड्या आपला गावचं लय भारी''... असे सांगत होता. आपल्या गावाचे नाव राज्यात पहिले आल्याचे समजताच बार्शीकरांनी अभिमानाने सोशल मीडियावरुन सुर्डीचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. गावातील अन् कामानिमित्त गावाबाहेर असलेल्या बार्शीकरांनीही फेसबुक, व्हॉट्सअपवरुन आनंद व्यक्त केला. दरम्यान, वॉटरकप स्पर्धेच्या कालावधीत सुर्डी गावात येऊन अनेकांनी श्रमदान केले. त्यामध्ये, गावचे सरपंच, ग्रामस्थांसह तालुक्यातील भूमिपत्र, स्वयंसेवी संस्था, स्थानिक राजकीय नेते, प्रशासनाने सहभाग घेत श्रमदान केले होते. पाणी फाऊंडेशनतर्फे तालुका समन्वयक म्हणून नितीन आतकरे आणि अदिक जगदाळे यांनी काम पाहिले.