लोकमत न्यूज नेटवर्करांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलाव ऐेन उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडा ठाक पडल्याने रांजणगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सध्या रांजणगाव एमआयडीसीतून पाणीपुरवठा सुरूकेला आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे तो पाणीपुरवठा अपुरा पडत असून, ग्रामपंचायतीने नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी स्वनिधीतून वाड्यावस्त्यावर पाण्याचे टँकर सुरू केल्याची माहिती सरपंच सुरेखा लांडे यांनी दिली. पाणीटंचाईबाबत सरपंच लांडे यांनी सांगितले की,रांजणगावच्या नागरिकांना पुरेसे व शुद्ध पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुमारे २० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेला कोंढापुरी तलावातून पाणीपुरवठा स्रोत आहे. मात्र गेल्या १० ते १५ दिवसांपासून कोंढापुरीचा तलाव पूर्णपणे कोरडाठाक पडल्याने ही पाणीपुरवठा योजना पूर्णत: बंद पडल्याने तात्पुरत्या स्वरूपात रांजणगाव एमआयडीसीतून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र हा होणारा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेने कमी पडत असून, ग्रामपंचायतीने शासनाच्या यंत्रणेवर विसंबून न राहता स्वनिधीतून टँकरची सुविधा उपलब्ध करून दिल्याने सध्यातरी नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर होण्यास मदत आहे.
कोंढापुरी तलावाने गाठला तळ
By admin | Published: May 09, 2017 3:30 AM