पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अधिक सक्षमपणे पोहोचवण्यात आपण कमी पडत आहोत. बाबासाहेबांनी लोकशाहीची मानवी मूल्ये रुजवली. त्या मूल्यांचा प्रसार प्रचार आपण करायला हवा. पाण्याच्या प्रश्नावर मूलभूत चिंतन त्यांनी केले होते, मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले.डॉ. दत्तात्रय गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर का जल चिंतन’ या हिंदी तसेच ‘जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व ‘भरती-ओहटी, जीवन संघर्ष’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी गव्हाणे बोलत होते. माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, बी. जी. वाघ, पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, यशदातील संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड उपस्थित होते. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)गव्हाणे म्हणाले, की बाबासाहेबांचे विचार आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचवण्याची गरज आहे. समाजातील सर्व स्तरातील लेखकांनी बाबासाहेब आंबेडकरांवर लेखन केले. त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. खोब्रागडे म्हणाले, की पाण्याच्या संघर्षावरूनच सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध झाले. सामाजिक व आर्थिक विकासाचा मुद्दा आंबेडकरी संघटनांच्या अजेंड्यावर नाही. लेखक व विचारवंतांनी सामाजिक व आर्थिक विषयावर लेखन केले पाहिजे. सत्ताबदलानंतर दलित, शोषितांना मिळणारा निधी बंद झाला. त्यामुळे हा समाज मूलभूत गोष्टींपासून वंचित राहू लागला आहे.
पाणीप्रश्नावर मूलभूत चिंतन
By admin | Published: March 29, 2017 2:41 AM