पुणे :कोणताही कार्यक्रम म्हटला की पत्रिका छापणे आलेच. भारतात तर बारशाच्या लग्नपत्रिकांपासून ते वर्षश्राद्ध आणि इतरही सर्व कार्यक्रमांच्या पत्रिका आवर्जून छापल्या जातात. इतकेच नव्हे तर हल्ली आर्थिक सुबत्ता दाखवण्यासाठीसुद्धा महागड्या लग्नपत्रिकेचा माध्यम म्हणून वापर केला जातो. पण प्रत्यक्ष या पत्रिका तयार करणाऱ्या एका कुटुंबाने मात्र मुलाच्या लग्नपत्रिकेत चक्क तुळशीचे बी मिसळले आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर पत्रिका टाकून देण्याऐवजी त्या मातीत पुरल्या तर रोपे येतील आणि ती कायमस्वरूपी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात ताजेपणा आणतील अशी त्यांची भावना आहे.
हा उपक्रम राबवला आहे पुण्यातील कव्हर कुटुंबाने. हे कुटुंब खरे तर मूळचे विदर्भातले आहे.त्यामुळे कमी वृक्ष संख्या आणि उन्हाच्या झळा त्यांनी जन्मजात अनुभवल्या आहेत. पुढे डीटीपी'च्या व्यवसायात त्यांनी हजारो पत्रिका बनवल्या पण 'झाडे जगवा, झाडे वाचवा' या पलीकडे त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा होती. त्याच विचारातून त्यांनी बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या इको-फ्रेंडली कागदाचा वापर केला आहे. या पत्रिका बनवणारे दिनेश म्हणतात, 'जगाचे वाढते तापमान बघता झाडांची आजही प्रचंड गरज आहे.त्यामुळे खूप विचार करून आम्ही हा उपक्रम राबवला. पत्रिका पुरल्यावर तयार होणारी रोपे प्रत्येकाला प्राणवायू देतील आणि आमचा उद्देश सफल होईल'. नवरदेव निलेश म्हणाले की,' मी अनेकदा वृक्षसंवर्धनाचे संदेश लिहिले आहेत. मात्र यावेळी मला प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. कार्यक्रम झाल्यावर पत्रिका फेकून न देता झाडांच्या रूपाने त्याच्या स्मृती कायमस्वरूपी टिकू शकतात'.ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी ती शेअरही केल्याची बघायला मिळत आहे'.