पुणे : देशाच्या पंतप्रधानांना निवडणुकीसाठी आता स्वत:च्या जातीचा आधार घ्यावा लागत आहे. जातीचे कार्ड वापरून राजकारण करताना पाच वर्षे देशभरात दलितांवर अत्याचार होताना नरेंद्र मोदी गप्प का बसले? गुजरातमधील उन्हामध्ये कातडी काढणाऱ्या कामगारांना बेदम मारहाण करून त्यांची धिंड काढताना मोदींना जात कशी आठवली नाही,असा सवाल महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.मनसेच्यावतीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावर गुरुवारी त्यांची जाहीर सभा झाली. राज ठाकरे म्हणाले,‘माझी भाषणे देशभरात जात आहेत. मोदींना माझ्या क्लिप कळत आहेत. उत्तर प्रदेशातही चार सभा घेण्याचा आग्रह होत आहे. पण आपल्याला हिंदी नीट बोलता येत नसल्याने मराठीतच बरे! असे म्हणत ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. या वेळी त्यांनी दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण काढताना ‘माझा वाघ गेला’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीचा खेळ करून ठेवला आहे. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता पण तेच केसाने गळा कापतात, तीच गत मोदींची झाली आहे. मोदींनी पाच वर्षांपूर्वी जी स्वप्न दाखवली, तरुणांना प्रलोभने दाखविली, महिला, शेतकरी, कष्टकरी वर्गांची फसवणूक केली. त्यांना निवडणुकीचा प्रचार भलतीकडे घेऊन जायचेय, असा आरोपही त्यांनी केला.>‘पुतळे नको; माणसे जगवा’एकीकडे देशात जिवंत माणसे जगवायला पैसे नाहीत तिथे देशात हजारो कोटी खर्च करून पुतळे उभारले जात आहेत. या देशात पाणी, रोजगार, नोकरी यासाठी तडफड होत असताना गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जातो. या देशाला आज पुतळ्याची गरज आहे का रोजगाराची, हे मोदींनी सांगावे. डोकलामचा विषय पुढे करून मोदींनी चीनची भीती घातली. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायला लावला, मग पटेलांचा पुतळा चीनमध्ये का बनविला, असे राज ठाकरे म्हणाले.
स्वत: जातीचा आधार घेताना दलित अत्याचार का विसरता?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:52 AM