लोणावळा : लोणावळा व मावळ तालुक्यात पुणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटनबंदीचा आदेश लागू केला असला तरी या आदेशाला केराची टोपली दाखवत शनिवार व रविवारी लोणावळयात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. भाजपाच्या निवेदनानंतर लोणावळा शहर पोलिसांनी भुशी धरण व लायन्स पॉईटकडे जाणाऱ्या मार्गावरील चेकपोस्ट नाके बंद केल्याने भुशी धरण व लायन्स पॉईटकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांचा मुक्तसंचार पहायला मिळाला. पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांनी बंदी असली तरी रस्त्यावरून जाता येत असल्याने किमान भुशी धरण व लायन्स पॉईट दूरून का होईना पहाता यावा याकरिता पर्यटकांनी त्यांच्या वाहनांचा ताफा त्या परिसरात वळविल्याने लायन्स पॉईट व शिवलिंग पॉईट तसेच गिधाढ तलाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
लोणावळयातील आल्हाददायक वातावरण व दरीमधून अलगदपणे वाहणारे धुके हा नजारा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात.
यावर्षी कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर लोणावळा व मावळ परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बजावले होते. या आदेशांनुसार लोणावळा शहर व ग्रामीण पोलीसांनी मागील चार महिन्यांपासून या आदेशाचे पालन करत पर्यटकांना पर्यटनस्थळ परिसरात जाण्याच मज्जाव केला होता.
अनलॉक चार मध्ये केंद्र व राज्य शासनाने नागरिकांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास परवानगी दिल्याने तसेच पासची अट रद्द केल्याने नागरिक एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ लागले आहेत. यामुळे पर्यटनबंदी असली तरी नागरिकांना व पर्यटकांना बिनधिक्कतपणे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर जाणे शक्य झाल्याने 2 ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या सुट्टीला जोडून आलेल्या शनिवार व रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधत पर्यटक मोठया संख्येने लोणावळयात दाखल झाले होते. यामुळे शहरातील सर्व रस्ते, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, सहारा पुल व लायन्स पॉईट परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. खंडाळा परिसरात देखील पर्यटक वाहनांची व पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. तुंगार्ली धरण परिसर, पवनाधरणाचा परिसर याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने स्थानिकांनी यावर नाराजी व्यक्त केली. लोणावळा शहराला व परिसराला कोरोनामुक्त करण्यासाठी स्थानिक नागरिक नियमांचे पालन करत असताना पर्यटकांची गर्दी मात्र कोरोनाला आमंत्रण देणारी ठरणार असल्याने प्रशासनाने यावर कडक नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.