- अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेता
' बासूदा' आपल्यात नसणारं. ही वेळ कधीतरी येणारं हे माहिती होतं. पण ते आता नाहीत हे मन मानायला तयार होत नाही. त्यांच्या आणि माझ्या सहजीवन व मैत्रीची एक गोड बाजू माझ्यापाशी आहे. यातच आनंद आहे. बासूदा यांचे व्यक्तिमत्व हे त्यांच्या चित्रपटांसारखंच होतं . त्यात कोणतीही गुंतागुंत नाही किंवा खूप मोठं असं '' Larger Than Life ' सारखं पण नाही. त्यांच्या कुठल्याच चित्रपटात कधी ते काल्पनिक गोष्ट सांगत नाहीत. त्यांच्या कुठल्याच व्यक्तिरेखा या आपल्या वेगळ्या विश्वातल्या वाटत नाहीत. आपल्याला माहिती असलेले लोक किंवा माहिती असलेला समाज किंवा शहर तिथं वावरणाऱ्या व्यक्तिरेखा चित्रपटात बघायला मिळतात. बासूदा हे अगदी तसेच होते. अतिशय गोड आणि साध्या पद्धतीमध्ये ते काम करायचे. एक आठवण झाली म्हणून सांगतो त्यांना चित्रपटाची गोष्ट अशी सांगता यायची नाही. जर कुणी चित्रपटाची गोष्ट काय आहे असं विचारलं तर पटकन पुढचा व्यक्ती पाच ओळींमध्ये सांगून मोकळा होतो. मराठीमध्ये असे अनेक दिग्दर्शक आहेत की ते इतक्या सुंदर वाक्यांमध्ये चित्रपटाची गोष्ट सांगतात की तुम्हाला ' हो' चं म्हणावं लागतं. परंतु चित्रपट नंतर तितका सुंदर बनतो की नाही हा वेगळा विषय ठरतो. बासूदा यांचं कौशल्य हेच होत की जी गोष्ट त्यांना प्रभावीपणे सांगता यायची नाही ते ती गोष्ट संहितेमध्ये अगदी चपखलपणे सांगायचे.
माझ्या ' रजनीगंधा' या पहिल्या चित्रपटापासून जे सात- आठ चित्रपट त्यांच्याबरोबर केले. त्या अनुभवातून मी हे नक्कीच सांगू शकतो. प्रत्येक चित्रपटाची संपूर्ण पटकथा आणि संवाद लिहून ते माझ्या हातात द्यायचे. ते वाचल्यानंतर हे कथानक काय आहे? कुठल्या लयीत उलगडत जाणारे ते कशा पद्धतीने समोर येणारे? त्याच्या व्यक्तिरेखेचे पदर काय आहेत, त्यातली मजा काय आहे हे ते इतक्या समर्थपणे सांगायचे की चित्रपटाची भाषा काय असते त्यावर त्यांची संपूर्ण पकड असल्याचं कळून यायचं. हे करताना कोणताही अभिनिवेश नाही, की मी बघा काहीतरी वेगळं करून दाखवतोय असा पवित्रा नाही. अगदी हसत खेळत पद्धतीनं छान गोष्ट सांगायचे.
आमच्या पहिल्या ' रजनीगंधा' या चित्रपटाच्या वेळेचा किस्सा अजूनही आठवतो. जेव्हा हा चित्रपट पूर्ण झाला. तेव्हा तो प्रदर्शित व्हायलाच दीड ते दोन वर्षे गेली.कुणी वितरक चित्रपटाला हात लावायला तयार नव्हते. बासूदा वितरकांकडे गेले की विचारायचे तुमचा हिरो कोण आहे? ते म्हणायचे अमोल पालेकर नावाचा नवीन तरुण आहे. बरं मग हिरोईन कोण आहे? ती पण नवीन आहे विद्या सिन्हा तिचं नाव आहे. बरं मग व्हिलन तरी कुणी नामवंत आहे का? तर बासूदा म्हणायचे की आमच्या चित्रपटात कुणी व्हिलनचं नाहीये. मग त्यावर वितरकांची प्रतिक्रिया असायची की 'आप फिर चित्रपट क्यू बना रहे हो? म्हणजे आपल्याकडे जी स्टार सिस्टीम आहे त्यापेक्षा वेगळं पाऊल हे बासूदा यांनी उचलले होते. आमचा हिरो आम्हाला राजेश खन्ना यांच्यासारखा 'रोमँटिक', अमिताभ बच्चन यांच्यासारखा 'अँग्री यंग मॅन' किंवा धर्मेंद्र सारखा ' ही मॅन' हवा होता. या आमच्या मनात हिरोंबद्दलच्या प्रतिमा होत्या. पण यापैकी काहीच नसणारा असा एक चेहरा घेऊन ते समोर आले होते. जो माझ्या शेजारी राहणारा, मला सहजी भेटणारा असा व्यक्ती असेल असा विचारच कधी कुणी केला नव्हता. आपल्या चित्रपटांमध्ये यापूर्वी नायक कधी बसमध्ये फिरणारा किंवा ऑफिसमध्येच जाऊन काम करणारा असा दिसला होता का? अशा व्यक्तिरेखा कुणी कधी पाहिल्याच नव्हत्या. म्हणून सर्वांना त्या व्यक्तिरेखेबद्दल आपुलकी वाटली. अरे हा आपल्यातीलच एक आहे, बहुतेक मला कोपर्यावरती भेटेल अस लोकांना वाटायला लागलं. माझ्या आयुष्यात त्याच्यासारख्याच घटना घडतात. हे जे वाटणं आणि त्यातून जी आपुलकी निर्माण होते ती बासूदा यांच्या चित्रपटातून मिळाली. ती माझ्या व्यक्तिरेखेद्वारे लोकांपर्यंत पोहोचविली. तरीसुद्धा त्याचं वेगळेपण त्यांनी टिकवून ठेवलं. बासूदा यांनी जे चित्रपट केले त्यातून त्यांचं मातीशी नात कधी तुटल नाही. हे दिसतं. माझा अभिनेता म्हणून जो प्रवास होता त्यामध्ये अभिमानाने सांगू शकतो की लोकांना माझ्या व्यक्तिरेखा लक्षात राहिल्या पण माझा अभिनय कधी लक्षात राहिला नाही. ती व्यक्तिरेखा लक्षात राहणं, तो जे करतोय ते बरोबर करतोय हा विश्वास वाटणं हे त्या व्यक्तिरेखांमधून मला सादर करायला मिळालं. बासूदा अनेक वर्षांपासून आजारी होते पण त्यावर कधी लिहून आलं नाही. त्यावर कधी स्पॉट लाईट गेला नाही. हा शांतपणे मागे राहून जगणारा माणूस होता.त्यांना मृत्यू देखील झोपेत शांतपणे आला असल्याचं कळालं. प्रत्येक माणसाला असच मरण हवं असत. जीवन शांतपणे हसऱ्या चेहऱ्याने संपण यापेक्षा दुसरं काय असू शकतं. बासूदांना माझी विनम्र श्रद्धांजली! ( शब्दांकन- नम्रता फडणीस )