नीरा : नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!
माऊली माऊली' नामाचा जयघोष करीत, टाळ-म्रुदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मंगळवारी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्थानांतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला.
पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक झुणका-भाकर, वेगवेगळ्या चटण्या, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला. नीरा नगरीत माऊलींचा पालखी सोहळा अकरा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. सव्वा अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदिच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगालावुन माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापुर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सिमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान घातले जाते. दुपरचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला.
नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून सर्वात पुढे तुतारी वादक सलामी देत होते, मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता. ब्रिटिशकलीन पुलावरून पालखी सोहळा जाताना मंद वारा सुटला होता. पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. आरफळकरांसह सोहळयाचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई यांसह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुक दत्तघाटावर आणल्या. 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी तिरावर एकच गर्दी केली होती.