शेलपिंपळगाव :ऐशी भानोबाची ख्याती !प्रतिवर्षी येती उत्सवासी !!भक्तिभावे पूजता त्यासी !दु:ख दैन्य निवारी !!श्रीक्षेत्र कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे रविवारी यात्रेत हजारो भाविकांनी देव-दानवांच्या युद्धाचा थरार अनुभवला. श्री भानोबादेवाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीनदिवसीय उत्सवामध्ये पहिल्या व दुसऱ्या दिवशी खेळले जात असलेले देव आणि दानवांचे युद्ध प्रत्यक्ष स्वत:च्या नयनांनी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविक आले होते.श्री भानोबाच्या स्वागतासाठी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती. यावेळी उत्साहात देवाचे स्वागत करण्यात आले. देवाच्या स्वागत सभारंभाला भाविकांची संख्या लक्षणीय होती. शनिवारी व रविवारी देव-दानवांमध्ये रंगलेले हे युद्ध पाहण्यासाठी तसेच श्री भानोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसांत हजारो भाविकांनी हजेरी लावली.तत्पूर्वी, रविवारी पहाटे श्री भानोबादेवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला. सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत देव-दानव युद्ध झाले. दोन दिवसांत एकूण १ हजार ३ भाविकांनी या युद्धात सहभाग घेतला.भानोबा देवाची महाआरती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबारीतून सुरुवात झाली. उत्सवात अखेरीस कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता. उत्सवात मनोरंजनपर कार्यक्रमाची मोठी रेलचेल ठेवण्यात आली होती.सोमवारी (दि. १०) सकाळी ६ ते ७ श्री भानोबादेवाचा ओलांडा, त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ७ श्री भानोबादेव आपल्या आजोळी प्रयाण करेल. त्यानंतर कुसेगावकरांना भावपूर्ण निरोप दिला जाईल. भानोबाच्या तीनदिवसीय उत्सवात आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते, उद्योजक राजेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे आदींसह विविध राजकीय पक्षांच्या मुख्य पदाधिकाºयांनी हजेरी लावली होती. तीनदिवसीय चाललेला हा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी-भानोबाच्या देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी पोलीस ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.हजारो वर्षांची परंपरामार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा दिन भानोबा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्वी शिवभक्त श्री भानोबादेवाला तस्करांनी कपट करून मारले होते. एक दिवस माझ्यासाठीही तुम्हाला मरावं लागेल, असा शाप त्यावेळी भानोबाने दिला होता. त्यामुळे भानोबादेवाच्या शापानुसार तस्करांना आजही देवाशी युद्ध करावे लागत असल्याची आख्यायिका आहे.देव आणि तस्कर या दिनाच्या प्रतिपदेला विशेष महत्त्व असल्याने संपूर्ण राज्यातून भानोबाचे भक्त या दिवशी उपवास करून कोयाळी येथे देवाबरोबर युद्ध खेळायला येत असतात. यावर्षी पहिल्या दिवशी ४५१ व दुसºया दिवशी ५५२ जणांनी युद्धात सहभाग घेतला होता.भानोबादेव मंदिराबाहेर पडल्यानंतर मानवरुपी दानवाने आपल्या हातातील शस्त्र (काठी) देवासमोर फिरवून उड्या घेतल्या. मात्र देवाच्या नजरेला नजर पडल्यानंतर ते त्या क्षणी जमिनीवर पडले. दरम्यान, त्यांना देवाचा स्पर्श देण्यात आला. त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात भानोबाचा जयघोष करून त्यांना शुद्धीवर आणले.
कोयाळी भानोबाची येथे रंगले देव-दानवांचे युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:41 AM