राजगुरुनगर : खेड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी चुरश वाढल्याचे दिसून येत असून, १६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सदस्यपदाच्या ३५ जागांसाठी ७१ उमेदवारांनी ७३ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.
कोयाळी तर्फे वाडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून तीन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. ७ जागांसाठी ११ उमेदवारांनी १३ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. दरकवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपद सर्वसाधारण स्त्री राखीव आहे. सरपंचपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे सरपंचपदाचा तिढा सुटून बिनविरोधचा मार्ग सुकर बनला आहे. ७ जागांसाठी ८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने दरकवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे.
खरपूड ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, ४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ७ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात उतरले आहे. कळमोडी धरण परिसरातील चिखलगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण स्त्री राखीव झाल्यामुळे राष्ट्रवादीविरोधात भाजप असा डावपेच चांगलाच रंगणार आहे. सरपंचपदासाठी ४ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत.
७ जागांसाठी १९ उमेदवारांनी निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. चाकण औद्योगिक पट्ट्यातील ५ व्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रियेत असणाऱ्या रोहकल ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. सरपंचपद सर्वसाधारण स्त्री राखीव झाल्यामुळे चार महिलांनी सरपंचपदासाठी नामनिर्देशन दाखल केले आहे. ७ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माघारीनंतर निवडणुकीचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.