लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी येथे रविवारी सकाळी एक वेगळीच झुंज पाहावयास मिळाली. दोन बिबटे आणि रानडुक्कर यांच्यात जवळपास २० मिनिटे झुंजीचा हा थरार चालला होता. रानडुकराने बिबट्यांना टक्कर दिली, मात्र जखमी झाल्याने त्याला पळ काढावा लागला.येथील शेतकरी शिवाजी बाळाजी लेंडे व दत्तात्रय दगडू लेंडे दोघे जण पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पिकाला पाणी देत होते. त्या वेळी त्यांच्यापासून काही अंतरावर त्यांना रानडुक्कर दिसले. हे रानडुक्कर पिकाची नासाडी करण्यासाठी येत असतानाच अचानक त्याच्यावर दोन बिबट्यांनी झडप घातली. झडप घातल्यानंतर रानडुकराने जवळपास २० मिनिटे या दोन्हीही बिबट्यांबरोबर चिवट झुंज दिली. त्यानंतर हे रानडुक्कर जखमी अवस्थेत निघून गेले. ही झुंज पाहणारे शेतकरी शिवाजी लेंडे व दत्तात्रय लेंडे भीतीने घाबरल्याने तेथून निघून गेले. घटना घडली तो परिसर निर्मनुष्य असून त्या ठिकाणी दाट झाडी आहे. त्यामुळे रानडुकरांना आश्रयासाठी जागा असल्याने तेथे त्यांचा मोठा वावर असतो. अनेक शेतकऱ्यांची पिके त्यांनी उद्ध्वस्त केली आहेत.
रानडुकराची बिबट्यांशी झुंज
By admin | Published: May 22, 2017 6:39 AM