बारामती : साप आणि मुंगसाचे वैर आपल्याला ज्ञात आहे... तसेच मांजराचे आणि सापाचेदेखील वैर असते... आज कऱ्हा नदीलगत हे वैरत्व नागरिकांनी अनुभवले. स्मशानभूमीच्या रस्त्याने धामण जातीचा साप सुसाट पळत होता. त्यामागे मांजर धावत होते. अखेर त्याला रस्त्यालगत असलेल्या विद्युत रोहित्राची पेटी दिसली. साप सरळ त्या पेटीमध्ये घुसला. त्याचा पिच्छा सोडायचा नाही, असा चंगच मांजराने बांधला. पेटीचा उघडा दरवाजा दिसला, त्यात त्याने उडी मारली. मात्र, वीजप्रवाह सुरू असल्याने साप आणि मांजराचा अंत झाला. वैराला प्रेमाने जिंकता येते, असे म्हटले जाते. मात्र, काही प्राण्यांचे वैर असे टोकाचे असते. कऱ्हा नदीच्या पात्रातून बाहेरच्या दिशेने मांजराने त्या सापाचा पाठलाग केला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी साप काही वेळा जागेवर थांबून त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मांजर त्यापेक्षा सरस ठरत होते. त्यामुळे सापाने थेट सुसाट पळ काढला. अचानक काही जणांचे या दोघांच्या लढाईकडे लक्ष गेले. साधारण ५ ते १० मिनिटे ही लढाई सुरू होती. अखेर साप रस्त्यालगत असलेल्या विद्युत रोहित्राच्या पेटीत घुसला. मांजराने पेटीत साप घुसल्याचे पाहिले. मांजराने सापाच्या मागे पेटीत उडी मारली. साप वीजप्रवाह सुरू असलेल्या तारेत अडकला. त्याचबरोबर मांजरालादेखील वीजप्रवाहाचा धक्का बसला. दोघेही तेथेच गतप्राण झाले. त्यांची लढाई पाहण्यासाठी गर्दी केलेल्यांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला; मात्र वीजप्रवाह सुरू असल्यामुळे काही करता आले नाही. या गर्दीत असलेल्या पोपट खरात या नागरिकाने सावधानता बाळगली. लहान मुलेदेखील ही लढाई पाहण्यासाठी आले होते. विजेच्या प्रवाहाने मुलांना धोका होऊ नये, यासाठी त्यांनी काळजी घेतली. काही ओळखीच्या तरुणांना बोलावले. सुजित रणदिवे आणि त्यांच्यासमवेत असलेल्या तरुण वायरमनला घेऊन आले. तेथील वीजप्रवाह बंद करण्यात आला. मात्र, उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांच्या करुण अंताबाबत हळहळ व्यक्त केली.
साप-मांजराची लढाई; दोघांचाही रोहित्रात करुण अंत
By admin | Published: November 18, 2016 6:05 AM