जेजुरी : पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळ खोमणे वस्ती येथे ज्ञानेश्वर खोमणे यांच्या घराशेजारी असलेल्या शेतात दोन धामण जातीच्या सापांच्या तुंबळ युध्दाचा दुर्मिळ दृश्य जेजुरीकरांना पाहायला मिळाले. खोमणे कुटुंबीयांनी त्यानंतर सर्पतज्ञाला बोलावले. सर्पमित्र दत्तात्रय मुरकुटे यांनी सापांना पकडून दूर निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. सर्पमित्र मुरकुटे यांनी या दृश्याचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले, हे दोन्ही धामण प्रकारातील नर जातीचे साप आहेत. ते एकमेकांशी युद्ध करताहेत. मात्र, एकमेकांना दुखापत किंवा चावा घेत नाही. केवळ एकमेकांची ताकद तपासली जात असते. या युध्दात थकणारा सर्प शेवटी निघून जातो. विजयी दुसऱ्याशी याप्रकारचे युद्ध करण्यास तयार राहतो. साधारण मार्च महिन्यात सातत्याने अशी दृश्ये दिसतात. एप्रिल महिन्यात अशा युद्धातून विजयी सर्पाच्या सानिध्यात मादी येते. प्रजननाच्या दृष्टीने मिलन होते. पुढे मे महिन्यात मादी साधारणपणे १८ ते २२ अंडी घालते. त्यानंतर ६५ ते ७० दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. धामण जातीचे साप विषारी नसतात. उलट ते शेतकऱ्यांचे मित्र म्हणून ओळखले जातात. शेतातील उंदीर खाण्यास ते एक्सपर्ट असल्याचे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन व रिसर्च सातारा संस्थेचे वन्यजीव अभ्यासक मुरकुटे यांनी सांगितले.
जेजुरीत दोन धामण सापांच्या युद्ध प्रसंगाचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 8:58 PM
पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळ खोमणे वस्ती येथे ज्ञानेश्वर खोमणे यांच्या घराशेजारी असलेल्या शेतात दोन धामण जातीच्या सापांच्या तुंबळ युध्दाचा दुर्मिळ दृश्य जेजुरीकरांना पाहायला मिळाले.
ठळक मुद्देधामण जातीचे साप विषारी नसतात.