पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील पुण्यातील पाच माजी नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाही, अशी टीका केली होती. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेतून भाजपमध्ये आलेल्या ५ माजी नगरसेवकांना समज देऊन तोंडं बंद करावी, अशी मागणी शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.
उदय सामंत म्हणाले, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महायुतीचा धर्म पाळून राज्यात काम करत आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजप, राष्ट्रवादीवर अशा प्रकारे टीका केली नाही. परंतु दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येऊन शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना अधिकार नसून, त्यांनी भविष्यात नगरसेवक होण्यासाठी तिकीट मिळते का, याचा विचार करावा. तसेच तिकीट मिळाले तर निवडून येतील का? याचेही आत्मचिंतन करावे. परंतु कोणावरही टीका करू नये, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची तोंड बंद करावी, असेही उदय सामंत म्हणाले.
म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटतात...
निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष फोडून बाहेर गेलेल्यांना बर्फावर झोपविण्याची धमकी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून देण्यात आली होती. परंतु निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर विश्वास ठेवून निवडून दिले. त्यामुळे महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. परंतु आता आदित्य ठाकरे यांना असुरक्षित वाटत असेल म्हणून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेट घेत आहेत, असा टोमणाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मारला. शिवाय राज्यात उद्योजकांना कोणी खंडणी मागत असेल, तर त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.