हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान खच्चून गर्दी, वाहनचालकांना तारेवरची कसरत, अपघात सदृशस्थिती अशा तक्रारी वारंवार करूनही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता उड्डाणपुलाखालील जागेमध्ये फेरीवाले, पथारीवाले, हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेते बसवले पाहिजेत. त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता खुला करणे हाच काहीसा पर्याय ठरू शकेल, अशी नागरिक मते व्यक्त करीत आहेत.
मागील १५ वर्षांपासून बायडाबाई साळुंके, रतन धुमाळ, तमन्ना माळी, कमल लोखंडे, सुरेखा वाघमारे, पांडुरंग सागरे आणि नागे यांच्यासह अनेक भाजीविक्रेते भाजीविक्री व्यवसाय करीत आहेत. दहा-बारा वर्षांपूर्वी फेरीवाले, पथारीवाले आणि भाजीविक्रेत्यांनाही उड्डाणपुलाखाली बसविले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला कोणताही अडथळा होत नव्हता. मात्र, सायंकाळच्या वेळी उड्डाणपुलाखाली ग्राहक मिळत नसल्याने एक एक करून फेरीवाले, भाजीवाले रस्त्यावर येऊ लागले. उड्डाणपुलाखाली बीआरटी बसेससाठी मार्ग केला. मात्र, पीएमपी बसेस अवघ्या ५०-६० मीटर जागेत धावतात. इतर जागेमध्ये टेम्पो आणि खासगी वाहने उभी केली आहेत. उड्डाणपुलाखाली जागा मिळाली तर उन्ह, वारा, पावसापासून संरक्षण होईल. रस्ताही वाहतुकीसाठी खुला होईल.
मागील काही वर्षांपूर्वी फेरीवाले-पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते उड्डाणपुलाखाली बसविले होते. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाल्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. या मंडळींनी पुन्हा पदपथ आणि रस्त्यावर बस्तान बसविले आहे. त्यामुळे आता हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान सोलापूर महामार्ग नाही, तर अघोषित फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांसाठी अधिकृत तळ बनविला आहे.
पालिकेने अ, ब, क, ड या प्रमाणे किती जणांना परवाने दिले आहेत आणि किती जण बिगर परवान्याने बसत आहेत. या ठिकाणी शेतकरी म्हणून किती भाजीविक्रेते आहेत, खरोखर शेतकरी आहे का, शेतकरी शेतमाल पिकवणार का, दिवसभर भाजीपाला विकणार, एका शेतकऱ्याकडे सर्व प्रकारचा भाजीपाला असतो का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण बहुतेक भाजीविक्रेते पं. नेहरू भाजीमंडईमधील आहेत.
----------------
अडथळा होणार नाही याची दक्षता हवीच
पालिकेने अ,ब,क,ड परवाना दिला आहे, तो वाहतुकीला किंवा नागरिकांना कोणताही अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी त्यांनी व्यवसाय करायचा आहे, असे ते प्रमाणपत्र आहे.
मात्र, या ठिकाणी सर्रास वाहतूक आणि नागरिकांना अडथळा होत आहे, तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे स्थानिकांनी वारंवार तक्रार केली आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जेव्हा अतिक्रमणे नसतात, त्यावेळी कारवाईसाठी येतात. भाजीविक्रेते सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत या ठिकाणी रस्त्यावर गर्दी करतात.
----------------