पुणे : अपघतांना आळा घालण्यासाठी वाहनचालक वाहतूक नियमांबाबत सजग असायला हवेत. त्यादृष्टीने ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी प्रशिक्षण देताना योग्यप्रकारे जनजागृती करणे गरजेचे आहे. परिवहन विभागानेही त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करायला हवेत, असे मत राज्याचे सह परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ड्रायव्हिंग स्कूल चालकांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबीराचा समारोप पाटील यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सीआयआरटीचे संचालक डॉ. राजेंद्र सनेर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नवाडे, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ.जयंत श्रीखंडे, रस्ता सुरक्षा अभ्यासक विनायक जोशी, मानसोपचार तज्ञ प्रवीण पारगावकर, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, सीआयआरटीचे प्रशांत काकडे आदी उपस्थित होते. या शिबीरामुळे ‘सेफ ड्रायव्हिंग कल्चर’ निर्माण होऊ शकेल. तसेच चांगले चालक निर्माण करण्यासाठी चांगल्या पायाभुत सुविधाही गरजेच्या असल्याचे ससाणे यांनी नमुद केले. शिबीरात सहभागी झालेल्या ड्रायव्हिंग स्कूल चालकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
------