इंदापूर / पळसदेव : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नं. १ च्या हद्दीत अतिवेगाने निगडीतील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव गेला. १० मे रोजी डाळज येथेच लक्झरी बस पलटी होऊन सख्ख्या बहिणांना आपला जीव गमावावा लागला तर त्याच दिवशी लोणी देवकर येथे मोटारीचा अपघात होऊन दोन प्रशिक्षीत डॉक्टरांचा जीव गेला. ही अपघातांची मालिका सुरूच असून जानेवारीपासून आजपर्यंत इंदापूर व भिगवण पोलीस स्टेशन ३५ किलोमीटर पट्ट्यात गंभीर अपघात होऊन तब्बल २६ निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. त्यामुळे या महामार्गाचे झालेले विस्तारीकरण धोक्याचे झाले आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इंदापूरला महामार्गावर वाहन चालवताय सावधान! वेगावर व झोपेवर नियंत्रण ठेवा.मागील १५ दिवसांत ७ अपघात झाले. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश अपघातात वाहनांचा अतिवेग नडल्याचे समोर आले असून आता तरी महामार्ग प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न आहे. शुक्रवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी इंदापूर हद्दीत पाहणी केली असता महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, तुटलेले गतिरोधक, अनेक ठिकाणी मुख्य रस्ता व सर्व्हिस रोडच्या दरम्यान राहिलेल्या जागेत अर्धवट बांधून सोडलेल्या गटारी, असुरक्षित अरुंद पूल. त्यातच रस्त्याच्यामध्ये उभी करण्यात येणारी अवजड वाहने, अनेक ठिकाणी दुभाजक तोडून लोकांनी विरुद्ध बाजूच्या रस्त्याकडे जाण्याची बेकायदेशीर सोय केली आहे. या सर्वच बाबी अपघातांस कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. याकडे महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा आहे.रस्ता सुसाट झाल्याने अपघातांची मालिका वाढली असून वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ते इंदापूर हा पट्टा ‘मृत्यूचा सापळा’ म्हणून ओळखला जातो. दररोज या ३५ किलोमीटरच्या पट्ट्यात अपघात होतातच. या अपघातात निष्पाप सर्वसामान्यांचे बळी जातच आहेत. मात्र, याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस यांना सोयरसुतक अथवा गांभिर्य दिसत नाही.........................चालकाच्या डुलकीमुळे अपघातमुंबईकडून सोलापूरकडे जाताना इंदापूरपर्यंतचे अंतर हे ३५० किलोमीटरपर्यंत येते. पुण्यापर्यंत दोन तास व तेथून इंदापूरपर्यंत तीन तास लागतात. पाच तासांचे ड्रायव्हिंग केल्यानंतर नेमकी या परिसरात येईपर्यंत चालकाला डुलकी लागते. तसेच सोलापूर ते इंदापूर १२५ किलोमीटर अंतर आहे. हे अंतर कापेपर्यंत चालकाला डुलकी येते आणि अपघात होतात. ......................तरडेवाडी सर्कल दुचाकी अपघातांचे केंद्रमहामार्गावरील येथील तरडेवाडी येथील सर्कलला सर्व्हिस रस्त्याने येणारे दुचाकीस्वार वेगाने महामार्गावर प्रवेश करतात आणि अपघात होतात. महामार्गावरून येणाऱ्या वाहनांचा वेग हा १४० किमीपर्यंत असतो. अपघातप्रवण ठिकाणे : डाळज, बिल्ट कंपनी, भादलवाडी, काळेवाडी, वरकुटे बु., लोणी देवकर, घागरगाव, एसपी पाटील संकुलासमोर, वणगळी, शहा, तरडगाव, भाबूळगाव या ठिकाणी वारंवार अपघात होतात. ................................ताशी १५० किमीचा वेग...भरधाव वेग अपघातांचे मुख्य कारण ठरत आहे. प्रत्येक वाहनाचा वेग सुसाट आहे. रस्ता प्रशस्त झाल्याने वाहने १५० ताशीच्या वेगात जात आहेत, अशा वाहनांवर कारवाई करण्यात हयगय केली जाते. जोपर्यंत महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे व स्पीडगन मशिन बसविली जात नाही, तोपर्यंत अपघातांचे हे सत्र कमी होण्याची शक्यता कमी आहे. जानेवारीपासून पाच महिन्यांत २६ ठार इंदापूर पोलीस स्टेशन हद्द : इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत जानेवारीपासून आजपर्यंत पाच महिन्यांत २१ पैैकी ९ गंभीर अपघात झाले. यात १० जण ठार झाले असून ३५ जण जखमी झाले आहेत. भिगवण पोलीस स्टेशन हद्द : भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत जानेवारीपासून आजपर्यंत पाच महिन्यांत सहा गंभीर अपघात झाले असून यात १६ जण ठार झाले आहेत, तर १५ जण जखमी झाले आहेत.
सावधान !..पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढत आहे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 8:53 PM
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ते इंदापूर हा पट्टा ‘मृत्यूचा सापळा’ म्हणून ओळखला जातो. दररोज या ३५ किलोमीटरच्या पट्ट्यात अपघात होतात.
ठळक मुद्देवेगावर, झोपेवर नियंत्रण ठेवा मागील १५ दिवसांत ७ अपघात झाले. यामध्ये ९ जणांचा मृत्यूरस्ता प्रशस्त झाल्याने ताशी १५० किमीचा वेग...