अनिल पवळ । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या नशेखोर व्यक्तींना एचआयव्हीची लागण होऊ नये, यासाठी औषधे व इतर सामग्रीचा पुरवठा करणारे केंद्रच दोन महिन्यांपासून बंद पडल्याने नशेखोरांना एचआयव्हीचा धोका वाढला आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात अशा प्रकारचे केवळ एकच केंद्र होते. पिंपरीतील हे केंद्र बंद पडल्याने या व्यक्तींची हेळसांड होत आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय एड्स नियंत्रणात्मक उपक्रम म्हणून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेची म्हणजेच नॅकोची (नॅको) स्थापना केली. या संघटनेच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांना त्या व्यसनापासून दूर करण्यासाठी औषधे तसेच त्यांना एचआयव्हीची लागण होणार नाही, यासाठी सुयांचा मोफत पुरवठा केला जातो. या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून स्वयंसेवी संस्थांना अशी केंद्र चालविण्यास दिली जातात. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासाठी सहारा अलहाद या स्वयंसेवी संस्थेला हे काम देण्यात आले. मात्र, या संस्थेच्या कामामध्ये अनियमितता आढळून आल्याने या केंद्राची मान्यता काढून घेतली. या केंद्रामध्ये ६० ते ८० व्यक्ती नियमित औषध आणि सुया घेण्यास येत असत. मात्र, केंद्रच बंद झाल्याने या व्यक्तींची गैरसोय होत आहे. सहारा आलहादवर कारवाई राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी अंमली पदार्थांचे सेवण करणाऱ्या व्यक्तींना परावृत्त तसेच एचआयव्हीपासून संरक्षित करण्यासाठी सहारा अलहाद या स्वयंसेवी संस्थेला जबाबदारी दिली. यासाठी केंद्र शासनाच्या ‘नॅको’ कडून भरघोस निधीही मिळत होता. मात्र, सहारा आलहाद या संस्थेने औैषध आणि सुयांचे बोगस वाटप दाखवून पैैसे लाटल्याच्या तक्रारी वारंवार होऊ लागल्या. याची दखल घेत कार्यक्रम अधिकाऱ्यांनी या केंद्राची पाहणी केली असता, तक्रारीत तथ्य आढळून आले. याचे गांभीर्य ओळखून ‘मसॅक्स’चे सह संचालक डॉ. लोकेश गभाणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केंद्र चालकांचा समाचार घेतला. तसेच, वाटप आणि साठा यांमध्ये कमालीची तफावत आणि औैषधांच्या साठ्याबाबत पुरेशी जागा आणि काळजी या मुद्द्यांवरून ९ जून रोजी कारणे दाखवा बजावून खुलासा करण्याची मागणी केली. मात्र, संस्थेकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने या सह संचालकांनी केंद्राची मान्यता काढून टाळे ठोकले. त्यानंतर दुसरे केंद्र सुरू करण्यात आले नाही.
नशेखोरांनो सावधान !
By admin | Published: July 17, 2017 4:01 AM