पुणे : चालत्या दुचाकीमधून साप निघाल्याची घटना पुण्यात साेमवारी घडली. अचानक दुचाकीच्या हॅंडेलच्या इथून साप बाहेर अाल्याने दुचाकी चालकाची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवत दुचाकी थांबविल्याने पुढचा अनर्थ टळला. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप अापल्या बिळातून बाहेर येत अाडाेसा शाेधत असतात. त्यामुळे अापली दुचाकी, चारचाकी बाहेर काढण्यापूर्वी या गाेष्टीची काळजी घेण्याची अावश्यकता असल्याचे या प्रकरणातून समाेर अाले अाहे.
साेमवारी दुपारच्या सुमारास ही घटना विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका चाैकात घडली. एक तरुण अापली दुचाकी घेऊन चालला असताना अचानक त्याच्या दुचाकीच्या समाेरच्या भागातून एक हिरव्या रंगाचा साप समाेर अाला. यामुळे त्या तरुणाची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्याने तातडीने गाडी रस्त्यातच लावून ताे बाजूला झाला. सुदैवाने एका सिग्नलच्या जवळ हा प्रकार घडल्याने दुचाकी मागून येणारी वाहने वेगात नव्हती. नागरिकांनी गाडी बाजूला घेत त्यातील साप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. साप इंजिनच्या अातमध्ये जाऊन बसला हाेता. जवळच एक गॅरेज असल्याने त्या गॅरेजमधील मॅकॅनीक अाकाश पवार याने संपूर्ण दुचाकी उघडली. ताेपर्यंत नागरिकांनी सर्पमित्राला फाेन केला हाेता. संपूर्ण गाडी खाेलल्यानंतर त्या सापाला बाहेर काढून एका बाटलीत भरण्यात अाले.
त्या तरुणाचे नशीब बलवत्तर हाेते त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. हा प्रकार पाहण्यासाठी माेठी गर्दी चाैकात झाली हाेती. या प्रकरणामुळे पावसाळ्यात गाडी बाहेर काढण्यापूर्वी हा पाहुणा अापल्या गाडीत नाही ना याची खबरदारी घेणे अावश्यक अाहे.