कल्याणराव आवताडे
लोकमत न्यूज नेटवर्क
धायरी : पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोनाची नवी प्रजाती (स्ट्रेन) आढळल्यामुळे प्रशासन सतर्क झाले झाले आहे. आत्तापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती.
मात्र, नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णामध्ये नवे ‘म्युटेशन’ आढळल्याने प्रशासनाने काही भागांबरोबर सोसायट्याही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना लसीकरणाला वेग आलेला असतानाच शहरात दररोज पाचशे ते आठशे नव्या कोरोनाबाधितांची भर पडत असल्याने खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
चौकट
लक्षणांमध्ये बदल
जुनी लक्षणे : ताप, खोकला, चव जाणे, गंध न येणे, जुलाब
नवी लक्षणे : डोळे लाल होणे किंवा डोळे येणे, अंगाला खाज येणे, डोकेदुखी, पायांच्या व हातांच्या नखांचा रंग बदलणे, घसादुखी, अंगदुखी.
यापैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्याने किंवा कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र, लक्षणे गंभीर असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. लक्षणे सौम्य असतील, फार त्रास होत नसेल तरी अंगावर काढू नये, असे तज्ज्ञ सुचवतात.
चौकट
“कोरोनाचा हा अगदीच नवा ‘स्ट्रेन’ आहे असे नाही. ही लक्षणे आधीही कोरोनाबाधितांमध्ये आढळत होती. मात्र, सध्या अशा पद्धतीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घ्यावा.”
-डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका
चौकट
“मास्क वापरणे, सतत हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे, गर्दीत जाणे टाळणे, त्याचबरोबर गरज नसताना घराबाहेर पडणे टाळावे. कोव्हिड लस जरुर टोचून घेतली पाहिजे.”
-डॉ. शुभांगी शाह, वैद्यकीय अधिकारी, स्व. मुरलीधर लायगुडे रुग्णालय