- हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी : सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा तडाखा वाढत आहे. या बदलत्या वातावरणातील शहरात सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर करत आहेत. अनेक वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उन्हाचा पारा जास्त आहे. त्यात अचानक येणाऱ्या अवकाळी पावसाने वातावरणात अधिक बदल झाले. त्यामुळे चक्कर येणे, मळमळ होणे, असे त्रास नागरिकांना होत आहेत.
डॉ. जितेंद शिंदे यांनी सांगितले की, होळीच्या सुरुवातीलाच संसर्गजन्य आजार व्हायला सुरुवात होते. एचथ्री आणि एनटू या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आहेत. या आजारात कोरडा खोकला हा ७ ते १४ दिवस राहण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घ्यावी.
सल्ल्यानेच औषधे घ्या
सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असल्यास मेडिकलमधून परस्पर जाऊन औषध घेऊ नयेत. त्यामुळे वेगळाच त्रास होण्याची शक्यता असते. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.
अशी घ्या काळजी
- संतुलित आहार घ्या.
- नियमित व्यायाम, योगा करा.
- उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरसे पाणी प्यावे.
- उन्हात घराबाहेर जाऊ नये.
सर्दी किंवा ताप असल्यास शक्यतो बाहेर जाणे टाळावे. तसेच बाहेर निघताना मास्क, सॅनिटायझर वापरायला हवे. गरम पाणी पिणे, हळद व मिठाच्या गुळण्या कराव्यात. ज्या नागरिकांना आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. जितेंद्र शिंदे, फॅमिली फिजिशिय