सणांमध्ये काळजी घ्या... अन्यथा पुन्हा निर्बंध लावू, अजित पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 04:07 PM2021-08-29T16:07:36+5:302021-08-29T16:07:44+5:30
सणासुदीचे दिवस आल्याने राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन
पुणे : राज्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येऊ लागली आहे. अनेक जिल्ह्यात निर्बंधात सूटही देण्यात आली आहे. परंतु नागरिक कोरोना पूर्णपणे नष्ट झाल्यासारखे वागू लागले आहेत. आता सणासुदीचे दिवस आल्याने राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सणांमध्ये काळजी न घेतल्यास पुन्हा निर्बंध लावू असा इशारा दिला आहे.
पवार म्हणाले, केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तिथे लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. एक सण मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्यामुळे आता तिथे प्रचंड कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याने पुन्हा निर्बंध लावावे लागले आहेत. महाराष्ट्रात गोपाळकाला, त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे मोठे सण ओळीने येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा मग निर्बंध लावावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
कोरोना वाढतोय... केंद्र आपल्याच चार मंत्र्यांना यात्रा काढायला सांगते
पवार म्हणाले, की नारायण राणे यांच्याबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. आम्हाला सरकार चालवायचे आहे. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्याचं काम करावं. एकीकडे केंद्र सरकार सांगतेय कोरोना महामारीची काळजी घ्या, गर्दी टाळा तर दुसरीकडे आपल्याच नवीन चार मंत्र्यांना ते सांगतात यात्रा काढा. त्यामुळे कोरोना वाढल्यास त्याला कोण जबाबदार आहे. याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा.
...तोपर्यंत अनिल देशमुखांबाबत बोलणार नाही
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय गुन्हे अन्वेशनकडून (सीबीआई) क्लीन चीट मिळाली आहे. अशा काही बातम्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याबाबत मी वाचले आहे. अनेक चौकश्या होत असतात. त्या-त्या वेळी सगळेजण चौकशीसाठी सहकार्य करत असतात. मात्र, देशमुख यांच्याबाबत जोपर्यंत मला अहवाल मिळत नाही. तोपर्यंत मी यावर काहीही बोलणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.