पुणे : लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सध्या आयटी रिटर्न भरण्याची आणि त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्याची करदात्यांची धावपळ सुरू आहे. आयटी रिटर्न भरताना 'फॉर्म १६' हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. सायबर भामट्यांनी आता फॉर्म-१६ च्या नावाने सुद्धा फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे फॉर्म १६ चे फसवे मेल येत असतील तर सावध राहण्याचा इशारा सायबर तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
हॅकर टोळ्यांकडून ई-मेलद्वारे सर्व लोकांना एकाच वेळी संपर्क केला जातो. एच.आर. विभागाकडून मेल पाठवला गेलाय, असे भासवण्यात येत आहे. मेलवर एक लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक करताच वैयक्तिक माहिती मागितली जाते. आयकर विभागाने फॉर्म - १६ साठी नवी व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला फॉर्म - १६ डाऊनलोड करा, असे ई-मेल मध्ये सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीने लिंकवर क्लिक केल्यास त्याला अशा पेजवर नेले जाते, जेथे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक डिटेल अशी सर्व माहिती मागितली जाते. या माहितीवरून आपल्या बँक अकाउंट वरून सर्व पैसे दुसऱ्या अकाउंटवर वळते केले जाऊ शकतात. तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करण्याची विनंती करून तुमचा नंबर हॅकर टोळ्यांकडे जाऊ शकतो. जेणेकरून ज्या बँक अकाउंटला तुमचा मोबाइल नंबर कनेक्ट आहे त्याचा ओटीपी मिळवून बँक अकाउंटमधील सर्व पैसे जाऊ शकतात, अशी माहिती सायबरतज्ज्ञ रोहन न्यायाधीश यांनी दिली.
-----हॅकर्स कंपनीच्या नावाशी मिळते-जुळते मेल बनवतात आणि त्याच्या मदतीने ईमेल शूट केले जातात. विविध प्रलोभने दाखवून ई-मेल मधील लिंकवर क्लिक करण्यास प्रवूत्त केले जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यास सिस्टिम हॅक होते आणि सर्व माहिती या हॅकर्सपर्यंत पोहोचते. लिंकवर क्लिक करताच मोबाइल किंवा कॉम्प्यूटरमध्ये एखादा बग इन्स्टॉल होतो, जो पूर्ण सिस्टमची माहिती नंतर रिमोट लोकेशन्सला पाठवतो.
- रोहन न्यायाधीश, सायबर सुरक्षा विशेषज्ञ---------काळजी कशी घ्यावी?
१. सहसा पर्सनल आणि कॉर्पोरेट ई-मेल अकाउंट एकाच मोबाइलमध्ये वापरू नये.२. बँकिंग अँप्लिकेशन्स मोबाइलमधून वापरायचे टाळावे. कारण मोबाइल हॅक झाला तर मोबाइलमध्ये असेलेले बँकिंग अँपसुद्धा धोक्यात येऊ शकते.३. ई-मेल / सोशल मीडियासाठी टू वे ऑथेंटिकेशनचा वापर करा. पर्सनल मोबाइल नंबर आणि पब्लिक मोबाइल नंबर वेगळा ठेवा.४. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ५. अज्ञात इंटरनेट वापरू नका. ६. लॅपटॉप आणि मोबाईल साठी फायरवॉल आणि अँटी व्हायरस विकत घेऊन इन्स्टॉल करावा.