पुणे : समाज शिकला सवरला असला आणि मुलींनी सर्व क्षेत्रांमध्ये भरारी घेतली असली तरी अजूनही ‘मुलगाच हवा’चा ही मनाेवृत्ती काही कमी झालेली दिसत नाही. पण, जर गर्भलिंगनिदान कराल तर तीन ते पाच वर्षे जेलची हवा खावी लागेल. म्हणून, जेलची वारी टाळायची असेल तर गर्भलिंगनिदान नकाेच, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
गर्भात असलेल्या अर्भकाचे ते मुलगा आहे का मुलगी, हे साेनाेग्राफीच्या माध्यमातून पाहणे म्हणजेच गर्भलिंगनिदान करणे हा गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) या कायद्यानुसार गुन्हा आहे. परंतु, यामुळे समाजात मुलींची संख्या कमी हाेऊन समताेल बिघडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, समाजाचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी मुलगा किंवा मुलगी हा भेद न करता मुलींना मुलाप्रमाणेच वाढविणे गरजेचे आहे.
पाच वर्षांचा कारावास, १५ हजाराचा दंड
जर गर्भलिंगनिदान करताना पकडले गेल्यास गर्भलिंगनिदान करणाऱ्या डाॅक्टरांसह संबंधित कुटुंबावर गुन्हा दाखल हाेऊ शकताे. ताे गुन्हा काेर्टात सिद्ध झाल्यास याअंतर्गत तीन ते पाच वर्षे शिक्षेची तरतूद आहे, तर दंड १५ हजार रुपयापर्यंत हाेऊ शकताे. तसेच लिंगनिदान करणाऱ्या केंद्राचा परवाना निलंबित तसेच रद्द करण्यात येताे.
येथे नाेंदवा तक्रार
जर गर्भलिंगनिदान हाेत असल्याचे कळल्यास राज्य शासनाच्या amchimulgi.gov.in या वेबसाईटवर किंवा 18002334475 या हेल्पलाईनवर तक्रार करता येते. त्याचबराेबर महापालिकेच्या किंवा जिल्ह्याच्या आराेग्य विभागातही तक्रार देता येऊ शकते.