पुणे : विद्यापीठ तसेच सर्व संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था यांच्या आवारामध्ये शांतता राहील तसेच इतरांच्या भावना दुखावणारे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारे कोणतेही कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गेल्या ६७ वर्षांपासून अविरत परिश्रम करून विद्यापीठाने जो नावलौकिक मिळविला आहे, त्याचे जतन करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी केले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे पडसाद काही दिवसांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये उमटले. त्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांच्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी परिपत्रकाद्वारे सर्वांना आवाहन केले आहे.शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये भारतीय संविधानांनुसार प्राप्त झालेल्या अधिकार आणि संविधानांमध्ये नमूद कर्तव्ये तसेच मर्यादांचे पालन होणे देखील आवश्यक आहे, असेही आवाहन गाडे यांनी केले आहे.कायद्यांचे पालन करणे व सुव्यवस्था राखणे तसेच राष्ट्रीय एकता व एकात्मतेस बाधा येईल, असे कोणतेही कृत्य घडणार नाही याची दक्षता घेणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी
By admin | Published: March 27, 2016 3:03 AM