पुणे : ऐतिहासिक पुण्यनगरीत संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू तुकोबांच्या पालख्यांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी संचेती चौकात गर्दी केली होती. पोलिसांनी मात्र पालखी समोर चालण्यासाठी त्यांना मनाई केली. पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान’ला एक नोटीस पाठवत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे सांगितले.
संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. परंतु, दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. तसेच भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही, असं आळंदी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. यापूर्वी भिडे गुरुजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणल्याने आणि तेढ निर्माण करणारी भाषण केली होती, त्यावरून गुन्हा दाखल झाला होता.