पुणे : दागिन्यांना पॉलिश करुन देतो, असे सांगून हातचलाखी करुन दागिने लंपास करणारी टोळी शहरात पुन्हा कार्यरत झाली असून या टोळीने कर्वेनगरमधील एका ५० वर्षाच्या महिलेला भुलवून तिचे ७ तोळ्याचे दागिने लंपास केले़.ही घटना कर्वेनगरमधील मातोश्री कॉलनीत बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली़ याप्रकरणी सुनिता टेके (वय ५०, रा़ मातोश्री कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ टेके या दुपारी घरी असताना दोघे जण त्यांच्याकडे आले़ त्यांना या दोघांनी तुमचे सोन्याचे दागिने चमकून दाखवितो, असे सांगितले़ त्यांच्या बोलण्याला भुलून त्यांनी आपल्याकडील सोन्याचे गंठण व पाटल्या दिल्या़ त्यांनी त्या एका डब्यात टाकल्या व त्यात हळद टाकून काही वेळ गरम करण्यास सांगितले़ हे करत असताना त्यांनी टेके यांची नजर चुकवून आतील दागिने काढून घेतले व ते निघून गेले़ काही वेळाने त्यांनी डबा उघडून पाहिले असता त्यात दागिने नव्हते़ त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला़ या चोरट्यांपैकी एक जण अंदाजे ३० वर्षाचा असून अंगाने मजबूत, बांधा, सावळा रंग, पाढऱ्या रंगाचा शर्ट व त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते़ दुसरा चोरटा अंदाजे २५ वर्षाचा असून अंगाने सडपातळ बांधा, सावळ्या रंगाचा असून त्याने अंगात जर्किन घातले होते़ दोघेही हिंदी बोलत होते़ दागिन्यांना पॉलिश करण्याचा बहाणा करुन येणाऱ्या चोरट्यांना भुलू नका, असे कोणी सांगत असेल तर तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी यापूर्वी अनेकदा केले आहे़ असे असले तरी अजूनही अनेक जण विशेषत: ज्येष्ठ नागरिक याला फसतात़ हे चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व एकटे घरात असलेल्यांना लक्ष्य करताना दिसून आले आहे़ दुसरीकडे दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात जाऊन तीन महिलांनी पावणेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास करण्याची घटना बिबवेवाडीत घडली़ याप्रकरणी विशाल राठोड (वय ३०, रा़ बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ राठोड यांच्या बिबवेवाडी येथील सिद्धीविनायक टॉवर्समध्ये राठोड ज्वेलर्स हे दुकान आहे़ बुधवारी दुपारी तीन महिला त्यांच्या दुकानात आल्या़ त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन त्यांना वेगवेगळे दागिने दाखविण्यास लावले़ दागिन्यांचे ट्रे काढत असताना त्यांची नजर चुकवून या महिलांनी २ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले़ या महिला गेल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला़ चोरी करताना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये या महिला दिसून आल्या असून बिबवेवाडी पोलीस तपास करीत आहेत़
सावधान! पॉलिशच्या बहाण्याने फसविणारी टोळी सक्रीय; कर्वेनगरात ७ तोळ्यांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 3:00 PM
दागिन्यांना पॉलिश करुन देतो, असे सांगून हातचलाखी करुन दागिने लंपास करणारी टोळी शहरात पुन्हा कार्यरत झाली असून या टोळीने कर्वेनगरमधील एका ५० वर्षाच्या महिलेला भुलवून तिचे ७ तोळ्याचे दागिने लंपास केले़.
ठळक मुद्देचोरट्यांपैकी एक जण अंदाजे ३० वर्षाचा, दुसरा चोरटा अंदाजे २५ वर्षाचा, दोघेही बोलत होते़ हिंदी चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व एकटे घरात असलेल्यांना लक्ष्य करताना आले दिसून