पुणे : सध्या सणासुदीमुळे बाजारपेठामध्ये नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. परंतु कोरोनाचा धोका अद्यापही दूर अथवा कमी झालेले नाही. यामुळे कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. यात मास्कचा वापर न करणारे व विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची साथ संपविण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे, हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील डॉक्टरांना तज्ञ डॉक्टर तसेच टास्क फोर्समार्फत कोरोना उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, त्यादृष्टिने कार्यवाही करावी. कोरोना कालावधीत पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत, त्यातील बाधित पोलिसांच्या तसेच कार्यरत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या उपचार सुविधाबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही पवार यांनी दिले.