पुणे : एका मॅट्रीमोनी साईटवरुन दोघांची ओळख झाली. ती पुण्यातील तो चेन्नईचा त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिला लग्नासाठी चेन्नईला बोलावूनही घेतले. लग्नाच्या रजिस्टर फॉर्मवर सही घेतली. त्यानंतर लग्न झाल्याचे बनावट प्रमाणपत्रही पाठविले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून व्यवसायासाठी गरज असल्याचे भासवून तिच्याकडून वेळोवेळी ११ लाख रुपये घेतले. इतक्यावरच तो थांबला नाही तर व्यवसायासाठी ८० लाखांचे कर्ज स्वत:च्या नावावर काढून देण्याची गळ घातली. त्याला तिने नकार दिल्यावर त्याने आपले खरे रुप दाखविले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.
अधिकतर तरुण-तरुणी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाल्याने आता जोडीदार शोधतानाही मदत घेतली जात आहे. मात्र यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यात अनेक तरुण -तरुणी या व्हाईट कॉलर चोरट्यांचे शिकार होत असताना दिसून येत आहे.
----------------
अशी होऊ शकते फसवणूक
मॅट्रीमोनी साईटवर अनेक जण वेगवेगळ्या नावाने रजिस्टेशन करतात. अनेकदा ते परदेशात अथवा दुसर्या शहरात असल्याचे भासवितात. मोठ्या कंपनीत मोठया पदावर असल्याचे सांगतात. काही महिने सोशल मिडियावर चॅटिंग करतात. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगतात. अनेकदा परदेशातून वाढदिवसाला महागडे गिफ्ट पाठविले असल्याचे सांगतात. त्यानंतर ते कस्टममध्ये अडकल्याचे भासवून पैसे उकळतात.
अनेकदा अशा व्यक्ती बनावट नावे, फोटो धारण करुन तरुण अथवा तरुणींशी संपर्क साधतात. त्यांना भावनिक आवाहन करतात. संबंधित तरुण तरुणी आपल्या काह्यात आल्याचे दिसताच त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैशांची मागणी केली जाते. आपला होणारा पती -पत्नी अडचणीत असल्याचे समजून मग ते मदत करतात. पण त्याची मागणी वाढतच जाते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते.
------------------
ही घ्या काळजी
साेशल मीडियावर अथवा मेट्रीमोनी साईटवर ओळख झालेली व्यक्ती ही तीच आहे, याची खात्री करा. संबंधितांना अथवा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती घ्या.
* केवळ फेसबुक, व्हॉट्सॲपवर दिलेल्या माहितीवर विसंबून राहू नका
* आपल्या होणार्या जोडीदाराकडे कधीही कोणी पैसे मागत नाही. त्यामुळे असे कोणी पैशांची मागणी केली तर त्यापासून सावध रहा.
* लग्नाअगोदरच तो किंवा ती पैसे मागत असेल तर लग्नानंतर काय करेल, याची अगोदर विचार करा.
..........
मेट्रीमोनी साईटवरुन झालेल्या ओळखीतून फसवणूकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. या वर्षी आतापर्यंत अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे ६७ तक्रारी सायबर पोलिसाकडे आल्या आहेत. त्यामुळे मेट्रीमोनी साईटवर झालेली ओळखीवर विसंबून कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सावधानता बाळगा
- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस, पुणे