पुणे : रिफाइंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत आहे. मात्र, अशा जाहिरातींना भुलून तेलाची निवड करण्यापेक्षा आपली जनुके, वास्तव्याचे ठिकाण, परंपरा लक्षात घेऊन तेलाची निवड करणे आवश्यक असते. तेल घाण्याचे असो की रिफाइंड ते कमीच वापरावे, याकडे हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
आहारात तेलाचा जास्त वापर केल्याने रक्तदाब, स्थूलता, हृदयरोग आदी विकारांना आमंत्रण मिळते. अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील ‘बॅड कोलेस्टेरॉल’ वाढते आणि हृदयाशी संबंधित विकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. शहरात लाकडी घाण्याची दुकाने पाहायला मिळत आहेत. घाण्यावर काढलेल्या तेलात ‘गुड कोलेस्टेरॉल’ अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, जाहिराती आणि ‘ट्रेंड’ला न भुलता योग्य तेलाची निवड करणे आवश्यक ठरते.
चौकट
“सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असलेली तेले हृदयाला जास्त हानिकारक असतात. त्यातुलनेत मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असलेली तेल हृदयासाठी चांगली मानली जातात. रिफाइंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. शेंगदाण्याचे तेल लाकडी घाण्यातील असले तरी ते ‘सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड’युक्त असल्याने हृदयासाठी हानिकारक ठरते. हृदयासाठी ऑलिव्ह, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, राईस ब्रॅन या प्रकारची तेले चांगली मानली जातात. मात्र, कोणतेही तेल परिपूर्ण नसते. त्यामुळे तेलांचे मिश्रण वापरता येईल किंवा एक तेल एक महिना या पद्धतीने तेल वापरण्याचे वेळापत्रक आखता येईल. आपण ग्रामीण शैलीकडे पुन्हा वळत असलो तरी आधुनिक विज्ञान नाकारणे शक्य होणार नाही. आधुनिक विज्ञानाच्या आधारे निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न व्हावा.”
-डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ज्ञ
चौकट
चौकोनी कुटुंबाला महिन्याला दोन किलो
“रिफायनिंग तेलात वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. अशुद्धपणा घालवण्यासाठी अॅसिड वापरले जाते. त्यातील व्हिटॅमिन्सही निघून जातात. त्यामुळे लाकडी घाण्यावरील तेलाला प्राधान्य दिले जाते. गाळलेले तेल आहारात समाविष्ट करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. पूर्वी तेलाचे रिफायनिंग होत नव्हते. त्यावेळी रासायनिक प्रक्रिया न केलेले तेलच वापरले जात असे. तुपाचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर डालड्याचा पर्याय आला. डालडा म्हणजेच पाम तेलातील रसायनांचे प्रमाण घातक असल्याचे लक्षात येताच ते प्रमाण कमी झाले. प्रत्येक तेलाचा वितळण बिंदू वेगवेगळा असतो. त्यामुळे तेलाची योग्य निवड महत्त्वाची ठरते. एका माणसाने दररोज १५-२० ग्रॅम तेलाचेच सेवन करावे, याप्रमाणे चार व्यक्तींच्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. आपली जनुके, वास्तव्याचे ठिकाण यानुसार तेल निवडावे. रिफाइंड असो की लाकडी घाण्याचे, तेलाचे आहारातील प्रमाण कमीच असले पाहिजे. प्रत्येक वनस्पती तेल कोलेस्टेरॉलमुक्तच असते. तेलाऐवजी अधूनमधून तुपाचा, लोण्याचा वापरही करता येईल.”
- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ