पुणे : गृहपाठ केला नाही आणि पुस्तके घरी विसरले यामुळे कोथरूड परिसरातील पी. जोग. शाळेतील एका शिक्षकाने सहावीतील १० ते १५ विद्यार्थ्यांना हातावर सूज येईपर्यंत छडीने मारल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यातच पुस्तके घरी विसरलात तर पुन्हा छडीने चोप दिला जाईल, अशी धमकी या शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण द्यावे, विद्यार्थ्यांच्या बालमनावर कोणतीही अपमानास्पद भावना कोरली जाऊ नये याची शिक्षकांनी काळजी घ्यावे, असे शिक्षण विभागातर्फे वारंवार सांगितले जाते. तसेच शासनाने याबाबत कायदे सुध्दा केले आहेत. मात्र, तरीही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना छडीने शिक्षा दिली जाते. परंतु, केवळ जागरूक पालकांमुळेच अशा प्रकारच्या घटना समोर येतात. स्नेहा जोगळेकर यांची मुले पी.जोग.शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सहावीतील मुलीला शिक्षकाने हातावर सुज येईपर्यंत मारले. मुलीच्या हातावर लाल रंगाचे वळ उठले आहेत. त्यामुळे जोगळेकर यांनी शाळा प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. शाळा बंद झाल्यानंतर शाळा प्रशासनाकडे याबाबतची तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे शाळा प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज पाहून नेमकी घटना काय घडली. हे समजून घेतले जाणार आहे, असे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)माझ्या मुलीसह सहावीत आठ मुलींना आणि पाच ते सहा मुलांना शिक्षकाने छडीने मारले. माझ्या मुलीचा हाताला सूज आली असून त्यावर मलम पट्टी करावी लागली आहे. गृहपाठ पूर्ण करून आणला नाही तर पुन्हा छाडीने मारणार असल्याचे शिक्षकाने धमकावले आहे. मी शाळेकडे याबाबत तक्रार दिली. -स्नेहा जोगळेकर, पालक संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित केले जाईल. तसेच त्यांच्यावर खासगी शाळा सेवाशर्ती कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्याच प्रमाणे अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना समज देण्यात येईल. - रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक, पुणे विभागविद्यार्थ्यांना मारहाण करू नये, अशा सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. मात्र,वस्तुस्थिती लक्षात घेऊन संबंधित शिक्षकावर योग्य कारवाई केली जाईल.- विनिता पुरी, मुख्याध्यापक, पी. जोग स्कूल
विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
By admin | Published: October 17, 2015 12:55 AM