लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रधानमंत्री गृहयोजनेत ऑनलाइन सोडतीद्वारे निवडलेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासण्याचे काम १ जुलै २०२१ पासून सुरू आहे. मात्र, या पात्र ठरलेल्या ११९० लाभार्थी हे कागदपत्रे तपासणीस गैरहजर राहिले आहेत. याबाबत त्यांना वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही ते गैरहजर राहिले आहेत. त्यांना शेवटची संधी देण्यात येत असून ३१ ऑगस्टपूर्वी कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहा. अन्यथा सदनिका वाटप रद्द करण्यात येईल, असा इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने दिला आहे.
पीएमआरडीएच्या कार्यालयाकडील सेक्टर १२ येथील गृहयोजनेसाठी २१ मे २०२१ रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती. निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी १ जुलै २०२१ पासुन सुरू आहे. मात्र, यातील ११९० लाभार्थ्यांना वारंवार विनंती, सूचना, मेसेज देऊनही ते गैरहजर राहिले आहेत. कागदपत्र तपासणीस अनुपस्थित असलेल्या लाभार्थ्यांची यादी http://lottery.pcntda.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे.
या ११९० लाभार्थ्यांना ई-मेल, मोबाईल मेसेजद्वारे वारंवार कळविले आहे. मात्र, ते तरीही प्रतिसाद देत नाही. या लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ३१ ऑगस्टपूर्वी कागदपत्रे तपासणीस हजर न राहिल्यास त्यांना लाॅटरीमध्ये लागलेल्या सदनिका या रद्द करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टनंतर त्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारे सहानुभुतीपूर्वक विचार अथवा विनंती मान्य करण्यात येणार नसल्याचे पीएमआरडीएने स्पष्ट केले आहे.