लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: “केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे गरजेचे आहे. सदाचार ही जीवनातील महत्त्वपूर्ण बाब आहे. सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सर्वांनी सदाचारी बनावे. परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा,” असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मंगळवारी (दि. १९) कोश्यारी बोलत होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव आदी या वेळी उपस्थित होते.
कोश्यारी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण बाबींचे अधिकाधिक ज्ञान ग्रहण करून विद्वान बनावे. भारत हा प्राचीन काळापासून अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो. आपल्या ज्ञानाचा देशहितासाठी उपयोग करा आणि सर्वांनी जगभरात चांगले नाव कमवा. तसेच नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत.
डॉ. नितीन करमळकर, डॉ. गजानन एकबोटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. डॉ. अंजली सरदेसाई यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. सूत्रसंचालन शामकांत देशमुख यांनी केले. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी आभार मानले.