बारामती : ‘मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. इंदापूरला उपाशी ठेवून इतरांना तुपाशी ठेवण्याची भूमिका मान्यनाही. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेऊन नीरा नदीवरील बंधाऱ्यात १२ महिने पाणी राहील याची खात्री द्यावी; अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. वेळप्रसंगी जनआंदोलन उभारण्याचा इशारा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास नीरा नदीतून बोगद्यातून भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. परिणामी नीरा खोºयातील शेती अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मूळ योजना कुंभी कासारी कोयना अशी आहे.
कुंभी, कासारी, कोयनेतून दर वर्षी १०० टीएमसी पाणी वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी सोमंथळी (ता. फलटण) येथे आणून नीरा खोºयात आणायचे. त्यातून २५ टीएमसी पाणी बोगद्यातून उजनीला द्यायचे. त्यानंतर उजनी जलाशयातून ‘ओव्हरफ्लो’ होणारे २५ टीएमसी पाणी बोगद्यातून मराठवाड्याला द्यायचे नियोजन, या मूळ योजना प्रकल्पात होते. हा मंत्रिमंंडळाचा निर्णय आहे. त्यामुळे हा मूळ प्रकल्प मान्य आहे. मात्र, या शासनाने कुंभी कासारी कोयना प्रकल्प सुरूकेला नाही. थेट त्यांनी नीरा खोºयातील बोगद्याचे काम सुरू केले. त्यावर आमचा आक्षेप आहे. या बोगद्यातून निरा खोºयाचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. गेल्या २० वर्षांत नीरानदीतून एकदा सुद्धा ५ टीएमसी पाणीसुद्धा वाहून जात नाही. नीरा खोºयातील पाण्यावर नीरा देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी चार धरणांत सर्व पाणी अडवले आहे. त्यामुळे त्यातून पाणी खाली वाहत नाही. नीरा खोºयातच पाणी नाही. मग,२५ टीएमसी पाणी बोगद्यातून देणार कसे? बोगदा बांधण्याचे नियोजन चुकल्याने उजनीतील मृतसाठा देखील शिल्लक राहणार नाही.मराठवाड्याला पाणी देताना बंधाºयांचा विचार होणारच नाही. यामध्ये बारामती, इंदापूर, फलटण तालुक्यांतील गावांचे नुकसान होणार आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील अधिक गावांचा समावेश आहे. याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने बैठक घ्यावी. त्यामध्ये इंदापूरला १२ महिने पाणी देण्याबाबत आदेश काढावा.नीरा नदीवरील बंधाºयात १२ महिने पाणी राहील याची खात्री द्यावी. समन्याय पाणीवाटपाचे तत्त्व लागू केल्यास नीरा खोºयातील पाणीवाटपात मराठवाड्याचा काय संबंध, असा सवाल पाटील यांनी केला आहे.उजनीच्या सर्व पाण्याचे वाटप झाले आहे. उजनीचा पाणीकोटा शिल्लक नाही. उजनीत पाणी शिल्लक नसल्याने अतिरीक्त पाणी उजनीमध्ये टाकून ते पाणी बोगद्यातून मराठवाड्याला द्यायचे आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री महाजन यांनी बैठक घ्यावी, असे पाटील म्हणाले.नीरा नदीच्या काठावरील १९ बंधारे आहेत. ते राज्य सरकारने स्वखर्चाने बांधले आहेत. त्याला राज्य शासनाने पाणी परवनागी दिली आहे. सगळ्या शेतकºयांच्या शेती योजनेचे, पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या पाण्याचे काय करणार, असा सवाल पाटील यांनी केला आहे.
मराठवाड्याला पाणी नेण्यासाठी मूळ योजनेप्रमाणे कुंभी कासारी कोयनेचे १०० टीएमसी पाणी नीरा खोºयात आणा, अशी आमची मागणी आहे. मूळ योजना नीरा खोºयातील २५ टीएमसी पाणी देण्याची नाही. पहिला टप्पा काढून टाकला, दुसरा आणि तिसºया टप्प्याचे काम सुरू केले.
जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील बंधाºयात १२ महिने पाणी राहील याची खात्री द्यावी. बंधाºयात पाणी इंदापूरसाठी आरक्षित करून वरचे उर्वरित पाणी त्यांना द्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.