पुणे : फायनान्स कंपनीच्या कार्डवर घेतलेल्या मोबाईलचे हप्ते थकविल्यामुळे विचारणा केल्याच्या कारणावरुन एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या कपाळावर कुऱ्हाडीने मारुन जखमी केले. ही पाषाण येथील एकनाथनगरमधील वेगडे वस्ती येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी सुनिल वाल्या धनावत (वय ३५, रा़ संजय गांधी वसाहत, लमाणतांडा, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश भिक्कू जाधव आणि उमेश भिक्कू जाधव अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनावत व आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. धनावत यांच्या फायनान्स कंपनीच्या कार्डवर आरोपीने मोबाईल घेतला होता. मात्र काही दिवसानंतर त्याने त्याचे हप्ते भरण्याचे थांबविले. यामुळे धनावत यांनी आरोपीकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली असता दोघांनी संगनमत करून धनावत यांच्या कपाळावर कुऱ्हाडीने मारले. तसेच यावेळी ते पळून जात असताना आरोपींनी पाठीमागून दगड फेकून मारत जखमी केले. ़़़़़़़़
मोबाईलचे हप्ते थकविल्याचे विचारले म्हणून कुऱ्हाडीने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 9:49 PM
मोबाईलचे हप्ते थकविल्यामुळे विचारणा केल्याच्या कारणावरुन मारहाण
ठळक मुद्देदोघांविरुद्ध गुन्हा दाखल