मंचर : शेताच्या बांधावर असणाऱ्या रायवळ व सुबाभळीच्या झाडाच्या फांद्या तोडत असण्याच्या कारणावरून तिघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सुनीता नवनाथ वाघ, नवनाथ बबन वाघ व मनोज नवनाथ वाघ यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निवृत्ती लक्ष्मण वाघ यांनी याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरुवारी (दि.२०) दुपारी दोनच्या सुमारास अवसरी खुर्द येथील दीढापाईन मळ्यात निवृत्ती लक्ष्मण वाघ, मुलगा गणेश व सून अंकिता हे त्यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या रायवळ व सुबाभळीच्या फांद्या तोडत होते. त्यावेळी नवनाथ वाघ यांनी येवून वाघ यांची सून अंकिता यांना ही आमची झाडे आहेत. ती तोडू नका असे म्हणून शिवीगाळ केली. सुनीता नवनाथ वाघ, नवनाथ बबन वाघ, मनोज नवनाथ वाघ यांनी अंकिता यांना मारहाण केली. निवृत्ती वाघ हे सोडवण्यासाठी गेले असता नवनाथ वाघ याने त्यांच्या हातातील काठी वाघ यांच्या डोक्यात मारली. तर मनोज नवनाथ वाघ हा कुऱ्हाड घेऊन मारण्यास आला. फिर्यादीचा मुलगा गणेश हा सोडविण्यास मधे आला असता कुऱ्हाडीचा मार गणेशच्या डाव्या हाताला लागल्याने तो जखमी झाला. आरोपी तिघांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर करत आहे.