सांगवी : कल्पतरु सोसायटीच्या प्रवेशद्वारावर एक व्यक्ती सुरक्षारक्षकासोबत वाद घालत उभा होता. त्याने वाहन मध्येच उभे केल्याने पाठीमागून येणाऱ्या डॉक्टर आदित्य पतकराव यांनी हॉर्न वाजविले. याचा राग येऊन आरोपी मनोज मोरया यांनी त्यांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता कल्पतरु सोसायटी, पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी आदित्य पतकराव (वय ३४) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज मोरया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी फेज २ मध्ये सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आरोपी आणि सुरक्षारक्षक यांच्यामध्ये वाद सुरू होता. आरोपीने वाहन प्रवेशद्वारावर लावल्याने बाकीच्यांना आतमध्ये जाण्यास अडथळा होत होता. यामुळे पाठीमागून आलेल्या डॉक्टर आदित्य यांनी हॉर्न वाजविला. याचा राग मनात धरून आरोपी मनोज याने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये फियार्दी यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करत आहेत.
हॉर्न वाजविल्याने सोसायटीच्या प्रवेशद्वारावर डॉक्टरला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 6:10 PM