लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महिला बचत गटाचे ऑफिस सुरू करण्यासाठी घर खाली करा, असे म्हणून ६ ते ७ महिलांनी एका महिलेला व तिच्या मुलीला मारहाण करीत घराबाहेर काढले. ही घटना वानवडीतील केदारीनगर येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.
याप्रकरणी एका ३४ वर्षांच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ६ ते ७ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फिर्यादीच्या पतीविरोधात बचत गटाच्या महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला पती व मुलीसह केदारीनगरमध्ये भाड्याने राहतात. त्यांचे काही महिन्यांपासून घराचे भाडे थकले होते़ मंगळवारी सकाळी काही महिला त्यांच्या घरात शिरल्या. तुम्ही आताच्या आता घर खाली करा, आम्ही आता येथे राहणार आहोत, असे सांगितले. त्यावर त्यांनी तुम्ही कोण अशी विचारणा केल्यावर त्यांनी आम्ही येथे महिला बचत गटाचे ऑफिस उघडणार आहे. त्यावर फिर्यादी यांनी माझे पती बाहेर गेले आहेत. ते आल्यावर बघु असे सांगितले. तेव्हा या महिलांना त्यांना व मुलीला शिवीगाळ करुन मारहाण केली व घराबाहेर काढले.
दरम्यान, फिर्यादी यांनी २०१९ पासून घरभाडे दिले नाही. तसेच त्यांचा भाडेकरार संपल्याने घरमालकाने महिला बचत गटाशी या रुमचा करार केला होता. त्यांना ८ दिवसात घर खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यानुसार ८ दिवसांनी या महिला आल्या़ तरी त्यांनी घर खाली केले नाही. फिर्यादीच्या पतीला फोन केल्यावर त्याने शिवीगाळ केली. त्यावरुन आता या महिलांनी विनयभंगाची तक्रार दिली आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.